डॉ. शशी थरूर यांची भूमिका; ‘टाटा लिटरेचर लाईव्हमहोत्सवाची सुरुवात

उदारमतवादी इतिहासकारांचे मत काहीही असले, तरी ब्रिटीश राजवट अन्यायकारकच होती. भारताच्या इतिहासातील तो काळा कालखंड होता, यात वाद नाही. कॅनडाच्या पंतप्रधानांनी या वर्षांच्या सुरुवातीला तेथील शिखांची जाहीर माफी मागितली होती. ब्रिटीश पंतप्रधानांनीही जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत संपूर्ण भारताची जाहीर माफी मागायला हवी, असे रोखठोक मत डॉ. शशी थरूर यांनी व्यक्त केले.

मुंबईत गुरुवारपासून चार दिवस चालणाऱ्या ‘टाटा लिटरेचर लाईव्ह’ या साहित्य महोत्सवाच्या उद्घाटनाच्या सत्रात ‘अ‍ॅन एरा ऑफ डार्कनेस – द ब्रिटीश एम्पायर इन इंडिया’ या डॉ. थरूर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन अमिताव घोष यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात डॉ. थरूर यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

अनेक उदारमतवादी इतिहासकारांच्या मते भारतातील ब्रिटीश राजवटीमुळेच भारतीयांना रेल्वे, प्रशासकीय सेवा, पोस्ट आदी सुविधा मिळाल्या. भारतातील आधुनिकतेचा कालखंड याच ब्रिटिशांमुळे सुरू झाला, असा या इतिहासकारांचा मतप्रवाह आहे. तो पूर्णपणे चुकीचा असून ब्रिटिशांनी भारताचे भयावह शोषण केले.

याबाबतची कागदपत्रे इंग्लंडमधील अनेक वस्तुसंग्रहालये, कार्यालये येथे उपलब्ध आहेत. आपल्या या पुस्तकात आपण या कागदपत्रांचा आधार घेऊनच मांडणी केल्याचे थरूर यांनी सांगितले.

ब्रिटिशकालीन भारतात दुष्काळ पडल्यावर मदत करू नका, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांना लेखी आदेश जायचे. ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या कालखंडात भारतीय लोकांना ठार मारल्याबद्दल फक्त चार प्रकरणांमध्ये गोऱ्या लोकांना कठोर शिक्षा झाली, असे अनेक दाखले थरूर यांनी दिले. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रदें यांनी ‘कोमागाटा मारू’ प्रकरणी संपूर्ण शिख समुदायाची जाहीर माफी मागितली होती. तत्कालीन कॅनडा सरकारने या जहाजाला अटकाव करून ते पुन्हा भारतात पाठवले होते आणि भारतात ब्रिटिशांबरोबर झालेल्या चकमकीत या जहाजावरील १९ शिखांचा मृत्यू झाला होता. ब्रिटीश पंतप्रधानांनीही पुढील दोन वर्षांत जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शताब्दीवर्षांनिमित्त त्यांच्या संसदेत भारतीयांची जाहीर माफी मागायला हवी, असेही थरूर यांनी स्पष्ट केले. थरूर यांच्या या अभ्यासपूर्ण मांडणीने टाटा लिटरेचर लाईव्ह या चार दिवसीय महोत्सवाची यथोचित सुरुवात झाली. त्याआधी या

महोत्सवाचे संस्थापक आणि अध्यक्ष अनिल धरकर यांनी महोत्सवामागील त्यांची भूमिका स्पष्ट केली. आता रविवापर्यंत एनसीपीए आणि पृथ्वी थिएटर येथे साहित्यविषयक विविध कार्यशाळा, परिसंवाद, सादरीकरण यांची रेलचेल असणार आहे.