विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपावरून काँग्रेसवर नाराज असलेले व काँग्रेसचा प्रचार न करण्याचा निर्णय घेतलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी आज पुन्हा एकदा आपली नाराजी उघड केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावरच टीका करत त्यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. काही वेळापूर्वीच खर्गे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये राफेलच्या केलेल्या पुजनावरून टीका करत, शस्त्र पूजनाला ‘तमाशा’ असे संबोधले होते. यावरून आता संजय निरूपम यांनी खर्गे यांना नास्तिक म्हटले आहे.

खर्गे यांच्याकडून करण्यात आलेल्या या विधानानंतर संजय निरूपम यांनी म्हटले आहे की, शस्त्रपूजा कधी तमाशा होऊ शकत नाही. देशात याची फार जुनी परंपरा आहे. मात्र अडचण अशी आहे की खर्गेजी हे नास्तिक आहेत, पण काँग्रेस पक्षातील सर्वचजण काही नास्तिक नाहीत.

फ्रान्सकडून भारताला मिळणाऱ्या ३६ राफेल लढाऊ विमानांपैकी पहिले विमान भारतात आणण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दसऱ्याच्या दिवशी पॅऱिसला गेले होते. तिथे त्यांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे या विमानातीच विधीवत पुजा केली. विमानावर ओम चिन्ह काढत त्यावर फुलं अर्पण केली तसेच या विमानाला कोणाची नजर लागू नये म्हणून विमानाच्या चाकांखाली नारळ आणि लिंबू ठेवत पूजन केले होते, यावरून मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर टीका केली आहे. अशा प्रकारच्या तमाशाची गरज नाही. जेव्हा आम्ही बोफोर्स तोफ भारतात आणली होती तेव्हा अशा प्रकारचा दिखावा केला नव्हता, असे खर्गे यांनी  एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले होते. .