गोवंडी, चेंबूर, मानखुर्द, ट्रॉम्बे या झोपडपट्टीबहुल परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे असलेले पालिकेचे शताब्दी रुग्णालय अजूनही करोनावरील उपचारांसाठी राखून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून या परिसरातील इतर आजारांच्या रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे.

गोवंडी, शिवाजी नगर, मानखुर्द, ट्रॉम्बे आणि चेंबूर परिसरातील रुग्णांसाठी शताब्दी रुग्णालय हे या परिसरातील पालिकेचे एकमेव रुग्णालय आहे. त्यामुळे थंडी-ताप अथवा गंभीर आजार तसेच प्रसूतीसाठी या रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठी गर्दी असते. मात्र मार्च महिन्यात करोनाने शिरकाव करताच इतर रुग्णालयांप्रमाणे हे रुग्णालयदेखील करोना रुग्णांसाठी राखीव करण्यात आले.

त्यामुळे इतर रुग्णांना गेल्या आठ महिन्यांपासून या ठिकाणी उपचार मिळत नसल्याने खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. मात्र खासगी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात लूट होत असल्याने हे रुग्णालय तत्काळ सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

इतर रुग्णांप्रमाणे प्रसूतीसाठी या ठिकाणी येणाऱ्या मातांची संख्यादेखील मोठी आहे. मात्र या ठिकाणी या महिलांना दाखल करून घेतले जात नसल्याने अनेक महिलांना शीव अथवा राजावाडी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे महिलांसह त्यांच्या कुटुंबीयांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत काँग्रेस स्लमसेलचे अध्यक्ष नीलेश नानचे यांनी शताब्दी रुग्णालय प्रशासनाला पत्र देऊन सर्वसामान्य रुग्णांसाठी तत्काळ ओपीडी सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

सध्याही या रुग्णालयात दहा-बारा करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे इतर रुग्णांना या ठिकाणी दाखल करण्यास अद्याप परवानगी नाही. पालिके ने आदेश दिल्यानंतर इतर रुग्णांसाठी ओपीडी चालू करण्यात येईल.

– अलका माने, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, शताब्दी रुग्णालय

आमच्या बाजूलाच शताब्दी रुग्णालय आहे. मात्र या ठिकाणी उपचार मिळत नसल्याने येथील रहिवाशांना दोनशे ते पाचशे रुपये खर्च करून शीव अथवा राजावाडी रुग्णालय गाठावे लागत आहे. त्यामुळे हे रुग्णालय तत्काळ सुरू करावे.

– राजेंद्र नगराळे, स्थानिक