बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने गळफास लावून आत्महत्या केली आणि अवघे बॉलिवूड हादरले. मात्र असा अकाली आणि अनपेक्षितपणे स्वत:च्या जीवनाचा अंत करणारी जिया एकटीच नव्हती. नैराश्य, खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील अपयश, एकटेपणा यांमुळे जीवनाला कंटाळलेले अनेक कलाकार बॉलिवूडने पाहिले आहेत. यापैकी काहींच्या मृत्यूबद्दल आजही दंतकथा ऐकायला मिळतात. यात अत्यंत मनस्वी अशा गुरुदत्तपासून दाक्षिणात्य चित्रपटांमधील ‘चटकचांदणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिल्क स्मितापर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे..

फोटो अल्बम : निराशेच्या गर्तेत निखळलेले तारे…

गुरुदत्त
चित्रपटसृष्टीला धक्का देणारा मृत्यू म्हणजे अत्यंत मनस्वी आणि कलंदर अशा गुरुदत्त यांचे निधन! चित्रपट कारकीर्दीत यशाच्या शिखरावर असताना अतिशय कमी वयात गुरुदत्त यांचा मृत्यू झाला. दारू आणि झोपेच्या गोळ्या यांचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे त्यांचे निधन झाले होते. त्याआधी त्यांनी तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांचे निधन म्हणजे आत्महत्या की अपघात, हा आजही वादाचा विषय आहे. गुरुदत्त आणि पत्नी गीता दत्त यांच्यात बेबनाव असल्याच्या बातम्या त्या वेळी सर्वश्रुत होत्या. पण तरीही गुरुदत्त यांचा मृत्यू अपघाती असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत होते.
मनमोहन देसाई
‘अमर अकबर अ‍ॅन्थनी’, ‘कुली’, ‘परवरिश’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करून एक काळ गाजवणारे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या मृत्यूभोवतीही गूढतेचे वलय आहे. मुंबईतील गिरगावातील ग्रँट रोड येथील त्यांच्या इमारतीतून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याही मृत्यूबाबत अनेक दंतकथा ऐकायला मिळतात. काही चित्रपट न चालल्याने त्यांना नैराश्याने ग्रासले आणि त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले, अशी एक वदंता आहे. तर पाठीच्या दुखण्यामुळे त्यांना स्वत:चा तोल सावरता आला नाही, आणि ते इमारतीवरून पडले, असेही बोलले जाते.
परवीन बाबी
एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असलेली ही कलाकार मंडळी अनेकदा आयुष्याच्या उत्तरार्धात एकाकी पडतात. परवीन बाबीच्या मृत्यूने ही बाब अधिकच अधोरेखित केली. तिच्या मृत्यूची बातमी उघडकीस आली, तीदेखील तीन दिवसांनी. तिच्या सोसायटीच्या सेक्रेटरीला घराच्या दरवाजाबाहेर वर्तमानपत्रांची भेंडोळी आणि दुधाच्या बाटल्या दिसल्या त्या वेळी! एकाकीपणाला कंटाळून तिने जीव दिला की, तिचा मृत्यू नैसर्गिकच होता, हेदेखील अद्याप गूढ आहे. अमिताभ बच्चनपासून अनेक बडय़ा कलाकारांबरोबर काम केलेल्या परवीनचे अखेरचे दिवस हे मानसिक अस्वास्थ्याचेच होते.
दिव्या भारती
वयाच्या विशीत शिरायच्या आधीच ‘विश्वात्मा’, ‘दिवाना’, ‘शोला और शबनम’ अशा एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेल्या दिव्या भारतीचा मृत्यू झाला. १९९३ मध्ये ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू पावली. दिव्याचा तोल गेला, तिला कोणी ढकलले की, तिने आत्महत्या केली, याबाबतचे गूढ अजूनही कायम आहे. अवघ्या १९ वर्षांच्या या अभिनेत्रीच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूडला चटका लावला होता.
सिल्क स्मिता
दक्षिणेत आपल्या मादक अदांनी अनेकांना घायाळ करणाऱ्या विजयालक्ष्मी ऊर्फ सिल्क स्मिताने १९९६ मध्ये विष पिऊन आत्महत्या केली. आपल्या १७ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत ४५०हून अधिक चित्रपटांमध्ये ‘हॉट सीन्स’मुळे गाजलेल्या सिल्कने हे पाऊल केवळ नैराश्य, तणाव, प्रेमभंग, अपयश आणि दारू यांमुळे केल्याचे बोलले जाते. कॅमेऱ्यासमोरील यशस्वी कारकिर्दीनंतर सिल्क निर्माती बनून आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि तिने आपले आयुष्य संपवले.
कुणाल सिंग :
‘दिल ही दिल में’ या चित्रपटातील ‘ए नाझनी सुनों ना’ या गाण्यामुळे अल्पावधीतच तरुणींच्या हृदयात स्थान पटकावणाऱ्या कुणाल सिंग यानेही गळफास लावून मृत्यूला कवटाळले. मात्र कुणालच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार ती आत्महत्या नाही, तर कुणालचा खून झाला होता. याबाबत काहीच माहिती पुढे आली नाही आणि चित्रपटसृष्टीत मृत्यूभोवतीच्या दंतकथेत वाढ झाली.
नेहा सावंत :
ही ११ वर्षांची चिमुकली ‘बुगी वूगी’ या गाजलेल्या नृत्य रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली नृत्यनिपुण कलावंत. अभ्यास आणि नृत्याचा क्लास सांभाळून ती शोमध्ये नृत्य करायची. पण आई-बाबांनी अभ्यासाकडे लक्ष देता यावे म्हणून नृत्य करण्यास मज्जाव केला. चिमुकलीने गळफास लावून घेऊन ४ जानेवारी २०१० रोजी डोंबिवलीतील आपल्या घरीच आत्महत्या केली.

ताणतणावांचा सामना करणे झेपत नसल्यामुळे जीवन संपवतेय असे चिठ्ठीत लिहून मॉडेल कुलजित रंधावाने ८ फेब्रुवारी २००६ रोजी आत्महत्या केली. अवघ्या २६ व्या वर्षी मॉडेल नफिसा जोसेफने २९ जुलै २००४ रोजी आत्महत्या केली. गौतम खंडूजाशी ती लग्न करणार होती मात्र त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट न दिल्याचे समजल्यावर तिने आपले जीवन संपविले. प्रियकर गौतम व्होरासोबत प्रेमसंबंध संपुष्टात आल्यावर मॉडेल विवेका बाबाजीने २५ जून २०१० रोजी वांद्रे येथील निवासस्थानी आत्महत्या केली.