शिकण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. फक्त तुमची स्वत:ची शिकण्याची तयारी व जिद्द असली की झाले. नोकरी व संसाराच्या व्यापात अनेकदा मनात असूनही काही गोष्टी करता येत नाहीत किंवा आपली आवड जोपासता येत नाही; पण निवृत्तीनंतर ठरविले तर ती ‘सेकंड इिनग’ आपल्या स्वत:च्या आनंदाबरोबरच समाजासाठीही उपयुक्त ठरू शकते. कल्याणच्या ७२ वर्षीय शीला सबनीस यांनी ते करून दाखविले आहे.

शीला सबनीस मूळच्या नाशिकच्या. त्यांचे शालेय शिक्षण नाशिकमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण नाशिक व पुणे येथे झाले. त्यांची आई इरावती वावीकर यांच्याकडून त्यांना सामाजिक सेवेचा वसा मिळाला. लग्नानंतर त्या कल्याणला स्थायिक झाल्या. रघुनंदन ऊर्फ नंदा सबनीस हे त्यांचे पती आणि अश्विनी ही मुलगी असा त्यांचा परिवार आहे. अश्विनी ‘खरेदी-विक्री’ करणाऱ्या एका मोठय़ा ऑनलाइन कंपनीत नोकरी करते. ‘आवड असेल तर सवड मिळते’ हे त्यांच्या आईने सांगितलेले वाक्य त्यांनी कायमचे मनावर कोरले. आईमुळेच मी सामाजिक कामाकडे वळले आणि थोडेफार सामाजिक काम करू शकले, असे त्या सांगतात.

१९७७-७८ मध्ये त्यांनी ‘सीआयटीडी’चा (सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ टीचर्स फॉर डेफ) एक वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. सुरुवातीला दादर येथे रोहिणीताई लिमये यांच्या विकास विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरी केली. त्यानंतर डोंबिवली येथील ‘रोटरी स्कूल फॉर डेफ’ शाळेत नोकरीला लागल्या. १९८३ ते २००३ अशी दीर्घकाळ सेवा करून शाळेच्या प्राचार्या म्हणून त्या निवृत्त झाल्या. कर्णबधिर मुलांची शाळा वाढविण्यात सबनीस बाईंचेही योगदान आहे. सबनीस बाई आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच तसेच रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेचा विस्तार केला. कर्णबधिर मुलांसाठी असलेल्या शाळांच्या संख्येत आता चांगल्यापैकी वाढ झाली असली तरी १९८३ च्या सुमारास तशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे रोटरीच्या या शाळेचा अनेक कर्णबधिर मुलांना मोठा आधार मिळाला. शाळेत कार्यरत असतानाच सबनीस बाई न्यूयॉर्कच्या रोचेस्टर क्लब ऑफ रोटरी क्लब येथे जाऊन आल्या. तेथील कर्णबधिर शाळा, त्याचे व्यवस्थापन त्यांनी पाहिले. भारतात परतल्यानंतर त्या अनुभवाचा फायदा त्यांनी शाळेसाठी करून दिला.

निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपली आवड व छंद जोपासायचे ठरविले. त्या दृष्टीने त्यांनी वेळेचे व कामाचे नियोजन केले. कर्णबधिर मुलांच्या शाळेत काम केल्यामुळे निवृत्तीनंतर त्यांनी या क्षेत्रातही जमेल तसे काम सुरूच ठेवले आहे. त्या जोडीला रोटरी क्लब, इनरव्हील क्लब आणि अन्य संस्थांच्या माध्यमातूनही त्यांचे सामाजिक काम सुरू असते. विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून काम करत असताना अनेक उपक्रमांत आपला सक्रिय सहभाग त्यांनी नोंदविला आहे. १९९६ पासून रोटरी क्लबच्या माध्यमातून त्या काम करत असून इनरव्हील क्लब-कल्याणच्या त्या संस्थापक सदस्य आहेत.

‘निसर्गोपचार’ आणि ‘प्राणिक हीलिंग’चे अभ्यासक्रम त्यांनी निवृत्तीनंतर पूर्ण केले. दोन्हीचा फायदा त्यांनी आपल्या कुटुंबासाठी आणि ओळखीच्या लोकांना करून दिला आहे. रोटरी क्लबतर्फे आयोजित जयपूर फूट (कृत्रिम पाय व हातवाटप) शिबीर आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. कल्याणला सोशल सव्‍‌र्हिस लीगतर्फे (धर्मार्थ डोळ्यांचा दवाखाना) डोळ्यांचा दवाखाना चालविला जातो. येथे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केले. या दवाखान्यासाठी त्यांनी वैयक्तिक २५ हजार रुपयांची देणगी दिली असून त्या व्याजातून दवाखान्यात वर्षांला एका गरजू व्यक्तीवर मोतीबिंदूची मोफत शस्त्रक्रिया केली जाते. रेड  क्रॉस ब्लड बँक, सेंट जॉन अ‍ॅम्ब्युलन्स या संस्थांमध्येही त्यांनी मानद सेवा दिली आहे.

सबनीसबाई यांचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे मूल दत्तक घेण्यासंबंधीच्या मार्गदर्शनाचे. मूल दत्तक घेण्याविषयी त्या दाम्पत्याला तसेच त्यांच्या घरच्या मंडळींना मार्गदर्शन करणे, दत्तक प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे भरून घेणे आणि याबाबत अन्य मार्गदर्शन व सल्ला देण्याचे काम त्या गेली तीस वर्षांहून अधिक काळ करत आहेत. मूल दत्तक देण्याचे काम करणाऱ्या भारतीय समाज सेवा-पुणे, वात्सल्य ट्रस्ट-कांजूरमार्ग व जननी आशीष-डोंबिवली या संस्थांची

माहिती पालकांना देण्याचे व या संस्थांचे कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्या करतात.

नोकरीच्या काळात गाण्याचा छंद त्यांना जोपासता आला नाही. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांनी गाण्याची आवड जोपासली. कल्याण येथे मंदार सोमण यांच्याकडे दहा वर्षे त्या गाणे शिक ल्या. ‘संगीत विशारद’ झालेल्या सबनीसबाई आता हौस व आवड म्हणून गाण्याचे कार्यक्रमही करतात. ‘लोकन्यायालय’ येथे ‘न्यायाधीश’ म्हणूनही त्यांनी दहा वर्षे काम केले आहे. महिलांनी महिलांसाठी चालविलेल्या गायत्री पतपेढीच्या संचालक, उद्योग मंदिर या संस्थामध्येही त्यांनी काम केले आहे. घरी कोणी रुग्ण असेल तर त्याच्या देखभालीसाठी माणसांची गरज भासते. इनरव्हील क्लबच्या माध्यमातून काही वर्षे त्यांनी अशी माणसे पुरविणारा ‘अटेंडंट ब्युरो’ही चालविला. वीस माणसे त्यांच्याकडे काम करत होती. या कामातून त्यांनी इनरव्हील क्लबसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली.

या कामातून मानसिक समाधान आणि आनंद मिळतो. प्रत्येक व्यक्तीनेच निवृत्तीनंतर काही ना काही छंद जोपासावा. आपल्या कुटुंबाबरोबरच काही वेळ सामाजिक कामासाठी दिला पाहिजे. आजच्या तरुण पिढीनेही आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून थोडा वेळ समाजासाठी द्यावा. अर्थात यासाठी घरातूनही पालकांनी लहानपणापासूनच मुलांवर तसे संस्कार केले पाहिजेत, असे सबनीसबाईंचे आवर्जून सांगणे आहे.