शीना बोरा हत्याप्रकरण : साक्षीदारांची नावे उघड करण्यास ‘सीबीआय’चा नकार

शीना बोरा हत्याप्रकरणातील साक्षीदारांची नावे उघड करण्यास आणि त्याची यादी शीनाची आई, तसेच मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, तिचा दुसरा व तिसरा पती अनुक्रमे संजीव खन्ना व पीटर मुखर्जी यांना देण्यास सीबीआयने शनिवारी नकार दिला. साक्षीदारांची नावे उघड झाली तर त्यावरून विनाकारण चर्चाना उधाण येईल आणि त्याबाबतच्या वृत्तांमुळे खटल्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करत सीबीआयने साक्षीदारांची यादी आरोपींना देण्यास नकार दिला.

विशेष सीबीआय न्यायालयाने मात्र सुरूवातीला तपासण्यात येणाऱ्या साक्षीदारांच्या नावांची यादी आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करण्याचे आदेश सीबीआयला दिले. तर दुसरीकडे या नावांबाबत गुप्तता बाळगण्याचे आरोपींच्या वकिलांना बजावले.

खटल्याला सुरूवात होणार म्हणून आरोपींच्या वकिलांनी साक्षीदारांच्या नावांची यादी उपलब्ध करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यामुळे शनिवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी सीबीआयतर्फे ही यादी आरोपींना उपलब्ध करणे अपेक्षित होते. परंतु ही साक्षीदारांची नावे उघड झाली तर त्यावरून विनाकारण चर्चाना उधाण येईल आणि त्याबाबतच्या वृत्तांमुळे खटल्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करत सीबीआयने यादी आरोपींना देण्यास नकार दिला. तसेच नावे उघड झाली तर सीक्षादरांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होऊ शकतो, असाही दावा केला. परंतु साक्षीदारांची नावेच उघड केली गेली नाहीत, तर त्यांची उलटतपासणी कशी करणार, असे सांगत आरोपींच्या वतीने सीबीआयच्या मागणीला आक्षेप घेण्यात आला. तसेच उलटतपासणीसाठी सीबीआयने साक्षीदारांची पूर्ण यादी उपलब्ध करण्याची गरज असल्याचे म्हटले.

सीबीआयच्या भूमिकेनंतर विशेष सीबीआय न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी सीबीआय तसेच आरोपींच्या वकिलांना चर्चेसाठी आपल्या दालनात बोलावले. त्यानंतर तेथे सुनावणीची पुढील तारीख आणि कोणत्या साक्षीदारांना पाचारण करण्यात येणार आहे हे निश्चित करण्यात आले. तसेच १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी साक्षीदारांची यादी सादर करण्याचे व सर्वप्रथम कोणत्या साक्षीदारांना पाचारण करणार हे सांगण्याचे आदेशही न्यायालयाने सीबीआयला दिले.

दरम्यान, इंद्राणी, पीटर आणि संजीव यांच्याविरोधातील पुरावे म्हणून सीबीआयने सादर केलेली २१६ कागदपत्रे स्वीकारण्यास तिन्ही आरोपींच्या वतीने नकार देण्यात आला. या कागदपत्रांमध्ये पीटर-इंद्राणीच्या लग्नाचा दाखला, त्यांचे जन्मदाखले तसेच त्यांच्यात ई-मेलद्वारे झालेला संवादाच्या कागदपत्रांचा समावेश आहे.