शीना बोरा हत्याकांड प्रकरणात तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे इंद्राणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शीना बोरा हत्या प्रकरणी इंद्राणी मुखर्जीला अटक करण्यात आली असून सध्या ती भायखळा तुरुंगात आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून सकाळी साडे अकराच्या सुमारास तिला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. अति तणावामुळे तिला रुग्णालयात दाखल केल्याचे समजते. इंद्राणी मुखर्जीला यापूर्वी एप्रिलमध्येही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

शीना बोरा हत्या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. २४ एप्रिल २०१२ मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. २०१५ मध्ये या हत्येचा खुलासा झाला होता. इंद्राणीचा ड्रायव्हर शामवर राय याला हत्यारे बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीतून शीना बोरा हत्याकांडाचा खुलासा झाला. शीनाच्या हत्येचा कट रचणे, तिचे अपहरण करणे, त्यानंतर तिची हत्या करणे, गुन्ह्याबाबत खोटी माहिती देऊन दिशाभूल करणे आणि पुराव्यांची विल्हेवाट लावणे असे मुख्य आरोप इंद्राणी, तिचा दुसरा व तिसरा पती अनुक्रमे संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. इंद्राणीने जामिनासाठी कोर्टात अर्जही केला होता. मात्र, कोर्टाने तिचा अर्ज फेटाळला होता.