शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयने कोर्टात दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची उद्यापासून सुनावणी होणार आहे. इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी आणि संजीव खन्ना या तिघांविरोधात हत्येच्या आरोपाप्रकरणी खटला सुरु होणार आहे.
शीना बोराची २०१२ मध्ये हत्या झाली होती. इंद्राणीचा चालक शाम राय याला दुस-या गुन्ह्याप्रकरणी अटक केली होती. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान शाम रायने शीना बोराच्या हत्येची कबुली दिली आणि तब्बल तीन वर्षांनी हे प्रकरण उघड झाले. इंद्राणी मुखर्जीने तिचा चालक, पहिला पती संजीव खन्नाच्या मदतीने शीना बोराची हत्या केली होती. शीनाचा मृतदेह रायगडमधील जंगलात जाळण्यात आला होता. पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल मुखर्जी यानेही शीना सर्वात शेवटी इंद्राणीसोबतच दिसली होती अशी माहिती पोलिसांना दिली होती. यामुळे इंद्राणीसमोरील अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी इंद्राणीसह संजीव खन्नाला अटक केली होती. तर तिच्या चालकाला माफीचा साक्षीदार बनवण्यात आले होते.
शीना बोरा हत्येप्रकरणी सर्वात शेवटी पीटर मुखर्जी यांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. इंद्राणी, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी हे तिघेही सध्या तुरुंगात असून कोर्टाने तिघांचेही जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राचा अभ्यास करण्यासाठी आणखी वेळ लागेल. म्हणून सुनावणी दोन आठवड्यांनी सुरु करावी अशी मागणी पीटर मुखर्जी यांच्या वकिलांनी कोर्टात केली. पण कोर्टाने मुखर्जी यांची याचिका फेटाळून लावल्याने शनिवारपासून प्रकरणाची सुनावणी होणार यावर शिक्कामोर्तब झाले.