शीना बोरा हत्या प्रकरणाचा सध्या तपास करीत असलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) दोन अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला पूर्वीपासून ओळखत असलेल्या आणि सध्या पश्चिम बंगालमध्ये कार्यरत असलेल्या दोन आयपीएस अधिकाऱ्यांकडून सीबीआय या प्रकरणी काही माहिती मिळते का, हे पाहणार आहे.
इंद्राणी गुवाहाटीहून पश्चिम बंगालमध्ये आल्यापासून हे दोन्ही आयपीएस अधिकारी तिला ओळखतात. हे दोन्ही अधिकारी तिच्या मित्रासारखेच आहेत. शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आणखी एक आरोपी आणि इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना यांचा विवाह होण्यापूर्वीपासून हे दोन्ही अधिकारी आणि इंद्राणीमध्ये मैत्रिपूर्ण संबंध असल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाला अजून काही वेगळ्या बाजू आहेत का, हे समजून घेण्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सीबीआयमधील सूत्रांनी याबद्दल माहिती दिली. ‘हिंदूस्थान टाईम्स’ वृत्तपत्राने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
इंद्राणी मुंबईमध्ये स्थलांतरित झाल्यानंतरही ती या दोन्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. त्यामुळे त्यांना या हत्येबद्दल काही माहिती आहे का, हत्येचा हेतू काय असू शकतो, याबद्दल त्यांच्याकडून माहिती मिळते का, याचीही तपासणी सीबीआय करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.