शीना बोरा हत्याकांड : इंद्राणीचा माजी वाहन चालक माफीचा साक्षीदार होण्यास तयार
बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाला बुधवारी पुन्हा एकदा नवे वळण मिळाले. शीनाची आई आणि हत्याकांडाची कथित मुख्य सूत्रधार इंद्राणी मुखर्जी हिला शीनाची हत्या करण्यासाठी मदत करणारा तिचा माजी वाहन चालक श्यामवर राय याने आपल्याला या हत्याकांडाबाबत सगळे खरे सांगायचे आहे, असा दावा करत माफीचा साक्षीदार बनण्याची इच्छा बुधवारी विशेष न्यायालयासमोर व्यक्त केली.
हत्याकांडाचे सत्य उघड करण्यासाठी आपल्यावर कुणीही दबाव टाकलेला नाही वा कुणी आपल्याला धमकावलेले नाही. उलट केलेल्या कृत्याचा आपल्याला पश्चात्ताप होत असल्यानेच आपण माफीचा साक्षीदार बनून शीना हत्याकांडाचा कर्ताकरविता कोण, ते कसे घडले आणि गुन्’ााचे भागीदार कसे बनलो हे सांगण्यास तयार आहोत, असे राय याने न्यायालयाला सांगितले. न्यायालयानेही त्याचे हे म्हणणे नोंदवून घेतले आहे.
गेल्या आठवडय़ातच राय याने हत्याकांडाचे सत्य उघड करण्यास तयार असल्याचे सांगत गुन्’ाात माफी देण्याची विनंती करणारे पत्र न्यायालयाला लिहिले होते. बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी राय याला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावून त्याला पुन्हा एकदा त्याच्या पत्राबाबत विचारणा केली. तसेच हे पत्र त्यानेच लिहिले आहे की नाही याबाबत शहानिशा केली. राय यानेही हे पत्र आपण लिहिले असल्याचे सांगत शीना हत्याकांडाबाबत आपल्याला सगळे ठाऊक असल्याचा दावा न्यायालयाकडे केला. त्यानंतर न्यायालयाने त्याच्याकडे हत्याकांडाबाबत विचारणा केली असता त्याने शीनाची हत्या करण्यात आली तेव्हा आपण तेथे होतो आणि हत्या करण्यास मदतही केल्याचे सांगितले. शीनाची गळा दाबून हत्या केल्याचेही त्याने न्यायालयाला सांगितले.
न्यायालय आणि राय यांच्यातील संभाषणावेळी इंद्राणी आणि तिला या हत्याकांडात साथ देणारा तिचा दुसरा पती संजीव खन्ना तसेच तिसरा पती पीटर मुखर्जी हे तिघेही न्यायालयात हजर होते.

१७ मेपर्यंत उत्तर देण्याचे सीबीआयला आदेश
राय याच्या माफीचा साक्षीदार बनवण्याच्या विनंतीवर १७ मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने सीबीआयला दिले. तसेच पुढील सुनावणीच्या वेळेस राय याला हजर करण्याचे आदेशही न्यायालयाने ठाणे कारागृह प्रशासनाला दिले आहेत. याप्रकरणी राय यालाच सर्वप्रथम पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतरच हे प्रकरण आणि त्यातील इंद्राणीचा सहभाग उघडकीस आला होता.