X

शीना बोरा हत्याकांड : इंद्राणी मुखर्जीला दिलासा नाही, जामीन अर्ज फेटाळला

इंद्राणी मुखर्जी आपली मुलगी शीना बोराच्या हत्या प्रकरणात सध्या मुंबईच्या भायखाळा तुरुंगात आहे.

हायप्रोफाइल शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीची जामीन अर्ज सीबीआयच्या विशेष कोर्टाने शुक्रवारी फेटाळला. इंद्राणी मुखर्जी आपली मुलगी शीना बोराच्या हत्या प्रकरणात सध्या मुंबईच्या भायखाळा तुरुंगात आहे.या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. २४ एप्रिल २०१२मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. २०१५ मध्ये या हत्येचा खुलासा झाला होता. जेव्हा इंद्राणीचा ड्रायव्हर शामवर राय याला हत्यारे बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. इंद्राणीवर आरोप आहे की, तीने आपला आधीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून आपल्या पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली होती. त्यानंतर २५ एप्रिल रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.

इंद्राणीने आपले वकील गुंजन मंगला यांच्याद्वारे विशेष सीबीआय कोर्टाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जात इंद्राणीने म्हटले होते की, भायखाळाच्या महिला तुरुंगात आपल्या जीवाला धोका आहे. यासाठी तिने दोन उदाहरणे देखील यात दिली होती. यामध्ये औषधांच्या ओव्हरडोसमुळे अर्धवट बेशुद्धावस्थेत तिला ६ एप्रिल रोजी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, याचा दाखला दिला आहे.

यावेळी तिच्या काही महत्वाच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या यामध्ये मेंदूच्या एमआरआयचाही समावेश होता. यावेळी रुग्णालयाने सांगितले होते की, जी ओषधे तिला डॉक्टरांकडून लिहून देण्यात आली नव्हती ती औषधे तिने घेतली होती.

First Published on: September 7, 2018 4:55 pm