बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील आरोपी आणि इंद्राणी मुखर्जीचा माजी वाहन चालक श्यामवर राय याला माफीचा साक्षीदार करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे सीबीआयने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले. श्यामवर राय याने मे महिन्यात माफीचा साक्षीदार होण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, सीबीआयने या याचिकेवर विचार करण्यासाठी न्यायालयाकडून वेळ मागून घेतला होता. अखेर आज सीबीआयने श्यामवर रायला माफीचा साक्षीदार करवून घेण्यास तयार असल्याचे सांगितले. यापूर्वी १० मे रोजी श्यामवर रायला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी या हत्याकांडाबाबत सगळे खरे सांगायचे आहे, असा दावा करत माफीचा साक्षीदार बनण्याची इच्छा श्यामवर रायने विशेष न्यायालयासमोर व्यक्त केली होती.

हत्याकांडाचे सत्य उघड करण्यासाठी आपल्यावर कुणीही दबाव टाकलेला नाही वा कुणी आपल्याला धमकावलेले नाही. उलट केलेल्या कृत्याचा आपल्याला पश्चात्ताप होत असल्यानेच आपण माफीचा साक्षीदार बनून शीना हत्याकांडाचा कर्ताकरविता कोण, ते कसे घडले आणि गुन्ह्याचे भागीदार कसे बनलो हे सांगण्यास तयार आहोत, असे राय याने न्यायालयाला सांगितले. शीनाची हत्या करण्यात आली तेव्हा आपण तेथे होतो आणि हत्या करण्यास मदतही केल्याचे सांगितले. शीनाची गळा दाबून हत्या केल्याचेही त्याने न्यायालयाला सांगितले होते.