शीना बोरा हत्या प्रकरणातील सहआरोपी पीटर मुखर्जी याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून  ह्रदय शस्त्रक्रियेसाठी त्याला खासगी रूग्णालयात हलवण्यास सीबीआय न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली.

पीटर मुखर्जी हा शीना बोरा प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जीचा तिसरा पती आहे. तो या हत्याप्रकरणातील सहआरोपी असून सध्या तो आर्थर रोड कारागृहात आहे. या दोघांवर सध्या खटला सुरू आहे. छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर पीटरला १६ मार्च रोजी जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सोमवारी पीटर मुखर्जीची अँजिओग्राफी करण्यात आली असता त्याच्यावर अँजिओप्लास्टी किंवा बायपास करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी दिलेला अहवालही सीबीआय न्यायालयातील विशेष न्यायाधीश जे सी जगदाळे यांच्यासमोर सादर करण्यात आला. मुखर्जी यांच्या वकिलांनी पीटर यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी मागितली. यासाठीचा खर्च पीटर मुखर्जी हे स्वत:च करतील, असे देखील कोर्टात स्पष्ट करण्यात आले. यानंतर कोर्टाने पीटर मुखर्जीला खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी दिली.

दरम्यान, शीना बोरा हत्या प्रकरणात पीटर मुखर्जी हा सायलंट किलर असल्याचे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआयने कोर्टात सांगितले होते. १० दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत सीबीआयने हा दावा केला होता. या प्रकरणात पीटरला जामीन मिळू नये अशीही विनंती सीबीआयने केली होती. पीटर मुखर्जी विरोधात सीबीआयकडे पुरेसे पुरावे आहेत, असेही कोर्टाला सांगण्यात आले होते.