शीना बोरा हत्याकांडाचा तपास मुंबईचे मावळते पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या देखरेखीखालीच होईल, असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी मंगळवारी संध्याकाळी स्पष्ट केले. गृह विभागाने राकेश मारिया यांची बढतीवर होमगार्डचे महासंचालक म्हणून मंगळवारी बदली केली. त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शीना बोरा हत्याकांडाचा तपास राकेश मारिया यांच्या नेतृत्त्वाखालीच गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. ते स्वतः खार पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्याम राय यांची चौकशी करत आहेत. हा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असताना राकेश मारिया यांची मंगळवारी तडकाफडकी बदली झाल्यामुळे पोलीस आणि माध्यम वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. शीना बोरा हत्याकांड प्रकरणामुळेच राकेश मारिया यांची बंदली करण्यात आली आहे, अशी चर्चा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे. त्यामुळे राकेश मारिया यांची बदली करण्यात आली, असे भाजपचे खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपालसिंग यांनी म्हटले होते. या सर्व पार्श्वभूमीवर गृह विभागाने या हत्याकांडाचा तपास पुढील काळातही राकेश मारियाच करतील, असे स्पष्ट केले. त्यांची जरी बदली झाली असली, तरी या गुन्ह्याच्या तपासावर तेच देखरेख ठेवतील, असे बक्षी यांनी स्पष्ट केले.