शीना बोरा हत्या प्रकरण

शीना बोरा हत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी घातलेल्या घोळाबाबत राज्याच्या गृह विभागाने पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडून नव्याने अहवाल मागविला आहे. माजी पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी याबाबत दिलेल्या एक पानी अहवालाबाबत गृहविभागाने असमाधान व्यक्त करत नव्याने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
२३ मे २०१२ रोजी शीनाचा मृतदेह सापडल्यानंतरही रायगड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा का दाखल केला नाही वा अपघाती मृत्यूची नोंद का केली नाही, याच्या चौकशीचे आदेश गृह विभागाने यापूर्वीच दिले होते.
त्याबाबत माजी पोलीस महासंचालक दयाळ यांनी एक पानी अहवाल सादर केला होता. मात्र हा अहवाल समाधानकारक नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता पूरक कागदपत्रांची गरज आहे. ते लक्षात घेऊन दीक्षित यांना नव्याने चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी दिली.
येत्या १५ दिवासांत हा अहवाल येण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, एका वरिष्ठ अधिकाऱ्यामुळे चौकशीत दिरंगाई झाल्याच्या वृत्ताविषयी भाष्य करण्यास बक्षी यांनी नकार दिला.