शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी आणि वाहनचालक श्यामवर राय याने न्यायालयाकडे माफीचा साक्षीदार होण्याची विनंती केली आहे. शीना बोरा हिची हत्या गळा दाबून करण्यात आली होती. त्याबद्दल सगळी माहिती माझ्याकडे आहे आणि ती देण्यास मी तयार आहे, असे त्याने न्यायालयात सांगितले.


शीना बोरा हत्याकांड प्रकरणात श्यामवर राय याच्यासह तिची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणी मुखर्जीचा नवरा पीटर मुखर्जी, इद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना हे सर्वजण आरोपी असून, ते सर्वजण कोठडीत आहेत. श्यामवर राय याने न्यायालयात सांगितले की, शीना बोराची हत्या कुठे झाली, हे सर्व मला माहिती आहे. तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता. त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो. या सगळ्याचा आता मला खूप पश्चाताप होतो आहे. त्यामुळे मी सर्व माहिती सांगण्यास तयार आहे. मला माफीचा साक्षीदार करण्यात यावे, अशी विनंती त्याने न्यायालयाकडे केली. त्यावर न्यायालयाने दोन्ही पक्षाचे मत मागवले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये हे प्रकरण उघडकीस आले होते. १९ नोव्हेंबरला मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिला अटक केली होती. या प्रकरणाचा सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाकडून तपास करण्यात येतो आहे.