शीतल गट्टाणी हे नाव गेली सुमारे २० र्वष ‘अमूर्त चित्रकर्ती’ म्हणून चित्रप्रेक्षकांना माहीत आहे. पण शीतल यांचं नवं प्रदर्शन हे अगदी निराळं आहे! शीतल यांनी त्यांच्या अमूर्त चित्रांशी काहीशी फारकत घेतलेली इथं दिसते. आजवर ‘चित्रप्रेक्षक’ नसलेल्यांनीही आवर्जून पाहावं आणि या प्रदर्शनातल्या दिवसा आणि रात्री दिसणारं शहर, हारीने लावलेली झाडं, फुलं, चहाचे कप, डायरी, पेन, टेलिफोन, दरवाजा.. आदी आकृतींच्या ‘दिसली- दिसेनाशी झाली’ अशा खेळाचा आनंद लुटावा, असं हे प्रदर्शन आहे.

‘काहीशी फारकत’ (पूर्ण नव्हे) असं म्हणण्याचं कारण हेच की, या आकृती सहज ओळखू येणाऱ्या असल्या तरी त्या दिसतातच असं नाही. या गॅलरीत ४६ खांब उभारून, त्या खांबांच्या एकेका बाजूवर एकेक चित्रं शीतल यांनी रेखाटलं आहे. खांब एकमेकांपासून दूर आहेत आणि एखाद्या विशिष्ट ठिकाणी उभं राहिल्यावरच त्यांच्यावरली आकृती सलग दिसू शकते. तसं  कुठे उभं राहायचं, यासाठी या दालनात लाल खुणा आहेत. पण तरीही, विशेषत डायरी आणि फोन तर अगदी निरखून पाहिल्यावरच दिसू लागतात. हा दृश्य-अदृश्याचा खेळ आपल्याला नव्यानं पाहायला शिकवणारा ठरतो. या खेळातून गवसतं काय? उरतं काय?

नाहीशा होणाऱ्या किंवा चटकन न दिसणाऱ्या वस्तू! जुन्या पद्धतीचा टेलिफोन कोण वापरतं हल्ली? शहर तेच आहे, पण इमारतींचं रूप बदलून त्या टोलेजंग होत आहेत. ‘कटिंग चहा’चे ग्लास दिसतात अजूनही- पण इथं या चित्रात दिसतो तसा- अनेक ग्लासांना वाहून नेण्याचा हँडल असलेला ‘क्रेट’ आताशा कुठेच दिसत नाही.

हे प्रदर्शन ज्या ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ गॅलरीत भरलं आहे, ती आकारानं मोठ्ठी असल्यामुळे याच दालनाच्या एका भागात शीतल गट्टाणी यांची चित्रंदेखील आहेत.. ही चित्रं केवलाकारी ड्रॉइंग्ज असावीत तशी प्रथम भासतात, पण जरा नीट पाहिल्यास त्यांच्या कागदांवर शीतल यांनी उंचसखलपणा आणला आहे आणि पोतापेक्षाही निराळा परिणाम साधण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. या चित्रांमधूनही हळूहळू एक दाटीवाटीनं वसलेलं शहर दिसू लागतं. ते दिसू लागल्यावर पुन्हा, तसं काही न दिसणाऱ्या चित्राकडे परत गेल्यास मूर्त-अमूर्ताचा प्रवासही लक्षात येऊ शकेल.

दक्षिण मुंबईत दादाभाई नौरोजी रस्त्यावर खादी भांडाराच्या बरोब्बर मागच्या दुसऱ्या-तिसऱ्या गल्लीत, ‘क्वीन्स मॅन्शन’ नावाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर (लिफ्टच्या सोयीसह) ‘गॅलरी केमोल्ड’ आहे. या रस्त्याला आता ‘घनश्याम तळवटकर मार्ग’ असं नाव असलं तरी पूर्वीचा हा ‘प्रिस्कॉट रोड’; म्हणून गॅलरीचं नावही ‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ असं आहे.

दिसतं तसंच असतं?

‘क्लार्क हाउस’ या नावाचं प्रायोगिक कलादालन कुलाब्याला रीगल सिनेमाच्या चौकातच, पण जरा आडबाजूला- म्हणजे ‘सहकारी भांडार उपाहारगृहा’च्या समोर आणि ‘वूडसाइड इन’ नामक रेस्तराँॅच्या जरा पुढे आहे. इमारतीच्या आवारात शिरल्यावर गॅरेजवजा शेडमधून चालत जाऊन उजव्या बाजूचं पहिलंच पांढरं (बहुतेकदा बंद असलेलं) दार आणि त्याशेजारची ‘क्लार्क हाउस’ ही पाटी दिसेल. दार ढकलून किंवा बेल दाबून आत गेलात की ही आर्ट गॅलरी ‘प्रायोगिक’ का म्हणावी, ते कळेल! शिवाजी मंदिर आणि छबिलदास शाळा यांच्यात जो फरक (१९८० च्या दशकात वगैरे) होता, तोच आजच्या ‘जहांगीर’पासून सर्व गॅलऱ्या आणि ही ‘क्लार्क हाउस’ गॅलरी यांच्या रंगरूपात आहे. घरासारख्या जागेतच ही गॅलरी आहे. खोल्याखोल्यांतून इथं चित्रं/ शिल्पं/ मांडणशिल्पं किंवा अन्य प्रकारच्या दृश्यकलाकृती मांडलेल्या आहेत. ‘पौर्वात्य नजरेतून पाश्चात्त्य/पौर्वात्य’ हे सध्या सुरू असलेल्या प्रदर्शनाचं सूत्र बऱ्याच कलाकृतींतून जाणवतं, पण काही कलाकृती या सूत्राशी फटकून वागणाऱ्या आहेत. तब्बल २२ कलावंतांच्या कलाकृती इथं असल्यामुळे सुसंगती नसणं साहजिकही आहे. याच प्रदर्शनातून जाणवणारं दुसरं सूत्र म्हणजे, ‘एखाद्या वस्तूचं किंवा कलाकृतीचं रूप आणखी निराळ्या संदर्भात दाखवणं’! याची ठळक उदाहरणं म्हणून अनेक कलाकृती दिसतील.. अविनाश मोटघरे याची कलाकृती लादी-पावांच्या साध्या छायाचित्रासारखी वाटते, पण मुळात हे पाव फोमसारख्या साधनापासून अविनाशनेच बनवलेले आहेत. म्हणजे पावांच्या शिल्पाचं छायाचित्र ही त्याची कलाकृती. सॅव्हिया लोपेझनं, वसई पंचक्रोशीतल्या गावकीत कोणी ख्रिस्तवासी झाल्यावर त्यांची विलापगीतं रचून म्हणण्याची सवय असलेल्या आजीला सॅव्हियानं लुगडय़ाच्या मृत्यूची कल्पना करायला लावली. लुगडं खरोखरच पुढल्या पिढय़ा वापरणार नाहीत.. ते जपून ठेवलं, तरी कलेवरासारखंच. हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते (या कलाकृतीबद्दल २८ जुलै रोजीच्या अंकात सचित्र माहिती दिली गेली होती.). पराशर लोंढे यानं व्हिडीओ कलाकृती केली आहे, त्यात आणखी एक चित्रफीत व्हिडीओवर सुरू असते.. हाही तिसऱ्याच कलाकृतीच्या- आणि त्यातून तिच्यामधल्या विचारांच्याही-  ‘अ‍ॅप्रोप्रिएशन’चा प्रकार आहे. अशा प्रकारे दुसऱ्याचं काम स्वतच्या भाषेत आणि शैलीत, स्वत कल्पना केलेल्या रूपात पुन्हा मांडण्याचा मार्ग योगेश बर्वे यानेही वापरला आहे.. त्यानं आफ्रिकन मुखवटय़ांबद्दलच्या एका फिल्मची प्रत्येक फ्रेम इथं एकापाठोपाठ मांडली आहे, आणि सोबत याच प्रदर्शनात मुखवटेही प्रदर्शित केले गेले आहेत.

या प्रदर्शनात पाहण्यासारखं खूप आहे. तेव्हा ते प्रत्यक्षच पाहिल्यास आणखी बरं!