राज्यात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शिवाय, मुंबईतही झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. “मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे! ” अशा शब्दांमध्ये शेलार यांनी टीका केली आहे.

“विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे! ” असे शेलार यांनी ट्वटि केले आहे.

आणखी वाचा- मुंबईत २६ वर्षांतला विक्रमी पाऊस; सप्टेंबर महिन्यातील विक्रम मोडला

मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. दरम्यान, रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत. आजही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.