”मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात थाळ्या व टाळ्यांचा उल्लेख झाला. आमचं हिंदुत्व तुमच्या थाळ्या व टाळ्या वाजवण्यासारखं नाही असं ते म्हणाले. हिंदुत्वाचाच विषय घ्यायचा असेल व टाळ्या व थाळ्या वाजवून होणार नसेल, जर टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या नाहीत, तर काय घरात बसून अंडी उबवायची? स्वतः घरात बसून मार्गदर्शन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हा अधिकार नाही.” असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या काल झालल्या दसरा मेळाव्यात भाषणाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्यांवरून भाजपावर टीका केली होती. आज भाजपा नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले.

”हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून वारंवार म्हटलं जातं. यातून त्यांच्या मनात असलेली एक असुरक्षितता व भीती यातून दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला केव्हाच आव्हान दिलं आहे की, अगोदर सरकार चालवून तरी दाखवा. आमचं तर म्हणनं आहे की कधीतरी घराबाहेर पडून तरी दाखवा.” असं यावेळी शेलार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना आव्हान केलं.

तसेच, ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणात थाळ्या व टाळ्यांचा उल्लेख झाला. आमचं हिंदुत्व तुमच्या थाळ्या व टाळ्या वाजवण्या सारखं नाही असं ते म्हणाले. मात्र सर्वात अगोदर तर हा संदर्भ चुकीचा आहे. टाळ्या व थाळ्यांचा हिंदुत्वाशी संबंध नव्हता. तो करोना योद्ध्यांचा उत्साह वाढवण्यासाठीचा विषय होता. हिंदुत्वाचाच विषय घ्यायचा असेल व टाळ्या व थाळ्या वाजवून होणार नसेल, जर टाळ्या आणि थाळ्या वाजवायच्या नाहीत, तर काय घरात बसून अंडी उबवायच्या? स्वतः घरात बसून मार्गदर्शन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना हा अधिकार नाही. महाराष्ट्र जेव्हा एका अर्थाने महापुरामध्ये, करोनामध्ये, चक्रीवादळामध्ये ज्यावेळा त्रस्त होता. त्यावेळी तुम्ही काय करत होता? हा महाराष्ट्र तुम्हाला प्रश्न विचारतो आहे.” असं यावेळी शेलार यांन म्हटलं.

“शिवसेनाप्रमुखांचं आणि तुमच्या हिंदुत्वामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. शिवसेनाप्रमुख म्हणायचे आम्हाला देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व नको. हे हिंदुत्व आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं. तुम्हीच बडवा ती घंटा तुम्हाला दुसरं येतंय काय? मला अतिरेक्यांना बडवणारं हिंदुत्व हवंय. नाहीतर करोना आला थाळ्या बडवा, घंटा बडवा हेच तुमचं हिंदुत्व. बेडूक उड्या, कोलांटी उड्या, दोरीच्या उड्या मारणारं हे कसलं हिंदुत्व. आमचं हिंदुत्व असं नाही,” असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून भाजपाला लगावला होता.