नास्तिक मेळाव्यात शेषराव मोरे यांचे प्रतिपादन
धर्मनिरपेक्षतेचा विचार करताना आधी धर्म म्हणजे काय, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. धर्माचा अर्थ नीट समजून न घेतल्यानेच देशात धर्मनिरपेक्षतेबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे आपण धर्माची व्याख्या काय करणार, हाच धर्मनिरपेक्षतेबाबतचा मध्यवर्ती मुद्दा असून आपल्या देशात धर्मनिरपेक्षता हे मूल्य नीट समजावून सांगितले जात नाही हे दु:खद आहे, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत शेषराव मोरे यांनी व्यक्त केले.
‘द ब्राइट ग्रुप’ व दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नास्तिक मेळाव्या’तील परिसंवादात ते शनिवारी बोलत होते. या वेळी देशात विविध कालखंडांत घडलेल्या घटना व भारतीय संविधानातील तरतुदी सांगत त्यांनी ‘धर्मनिरपेक्षता व निधर्मी राज्य’ या विषयावर मांडणी केली. पारलौकिक व इहलौकिक असे धर्माचे दोन भाग पडतात. यात धर्माचा इहलौकिक भाग संपूर्णपणे संविधानाच्या हाती देण्यात आला आहे. तर कायदा-सुव्यवस्था, आरोग्य, नीतिमूल्ये व दुसऱ्यांचे मूलभूत हक्क या चार अटी पाळूनच आपण आपल्या धर्मातील पारलौकिक भागाचे पालन करू शकतो. या अटी पाळल्यानंतर आस्तिकताही निरुपद्रवी ठरत असल्याचे सांगत या चार गोष्टींच्या अधीन राहून धर्मपालन केल्यास त्यात धर्म कितीसा उरतो, असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, दोन धर्मातील भांडणे रोखण्यासाठी धर्मनिरपेक्षता ही संकल्पना संविधानात ठेवण्यात आलेली नाही. तर एकाच धर्माच्या अनुयायांना त्याच धर्माकडून होणाऱ्या अन्याय व अत्याचारापासून मुक्त करण्यासाठीच धर्मनिरपेक्षता ही संकल्पना आहे. तसेच आपल्याकडे सर्वधर्म समभावाचा उल्लेख करत सर्व धर्माना समान लेखण्याचा पुरस्कार काही जण करत असतात. परंतु धर्माचा अभ्यास नसल्यानेच असे विचार व्यक्त केले जात असून, ते घातक असल्याचे मतही मोरे यांनी या वेळी व्यक्त केले.
या परिसंवादात डॉ. हेमचंद्र प्रधान व मिलिंद मुरुगकर हे मान्यवरही सहभागी झाले होते. या वेळी विज्ञानविषयक पुस्तकांचे लेखक जगदीश काबरे यांना ‘चार्वाक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. गेली तीन वर्षे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्य़ांमध्ये नास्तिक मेळावे भरवले जात असून, यंदा मुंबईमध्ये शनिवारी झालेल्या या मेळाव्यात मुंबई तसेच राज्याच्या विविध भागांतून अनेक नास्तिक विचारांचे तरुण, अभ्यासक, विचारवंत मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

हो, पुरोगामी दहशतवादीच!
शेषराव मोरे यांना ‘पुरोगामी दहशतवादी’ या त्यांनी विश्व साहित्य संमेलनावेळी केलेल्या शब्दप्रयोगाबद्दल या वेळी विचारले असता त्यांनी पुन्हा त्याचे समर्थन केले. ते म्हणाले की, हा शब्दप्रयोग मी भाषणात केला आहे. ते भाषण सर्वानी वाचावे, तेव्हाच त्यांना तसे का म्हटले आहे, याचा उलगडा होईल. मी फक्त सावरकरांवर पुस्तके लिहिली आहेत किंवा हिंदूंच्या बाजूने बोलतो म्हणून पुरोगामी मला प्रतिगामी ठरवतात. हिंदूंच्या बाजूने बोलू नये अशी अप्रत्यक्ष भीतीच घातली जाते. त्यामुळे हा पुरोगामी दहशतवादच आहे, असे सांगत ते म्हणाले की, अशा पुरोगाम्यांपेक्षा मीच खरा पुरोगामी आहे.