शीळ-डायघर येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २१ आरोपींना ठाणे न्यायालयाने शनिवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. शीळ-डायघर येथील लकी कंपाऊंडमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेत ७४ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी २१ आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली होती. यामध्ये बिल्डर, त्याचे साथीदार, महापालिकेचे अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि पत्रकार यांचा समावेश होता. ठाणे न्यायालयाने या सर्व आरोपींना २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान शनिवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने या सर्वाना ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता या सर्व आरोपींची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात आणले त्या वेळी न्यायालयाच्या परिसरात नागरिकांची गर्दी जमल्याने येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, यातील आरोपी बिल्डर जमील शेख याने  आपली रवानगी कल्याण कारागृहात करण्यात यावी, असा अर्ज न्यायालयात सादर केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.