भाभीजी घरपे है! फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेने आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली. मनसेने माझ्यावर जो काही अन्याय झाला त्यावेळी मला अजिबात मदत केली नाही. फक्त मराठीचा मुद्दा उचलून धरला होता. काँग्रेसमध्ये जातीपातीचं राजकारण केलं जात नाही. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये आले मनसेने फक्त मराठीचाच मुद्दा उचलून धरला होता. मला यापुढे त्यांची मदत घेण्याची वेळच येणार नाही असंही शिल्पा शिंदेने म्हटलं आहे.

शिल्पा शिंदेने संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मनसेवर निशाणा साधला. मनसेने मला मदत करण्याऐवजी फक्त राजकारण केलं. निर्मात्यासोबत झालेला वाद हा एक कलाकार म्हणून झालेला वाद होता. त्यावर काहीही भूमिका न घेता मनसेने मी मराठी आहे हा मुद्दा उचलून धरला. मला ते अजिबात पटलेले नाही. मला काँग्रेसची विचारसरणी पटते त्यामुळे मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महात्मा गांधींच्या काळापासून या पक्षाला प्रतिष्ठा लाभली आहे. तसेच या पक्षात जातीपातीचं राजकारण नाही असंही शिल्पा शिंदेने म्हटलं आहे.

या देशात सगळ्या गोष्टींमध्ये बदल घडणे आवश्यक आहेत. काँग्रेस हे बदल घडवू शकतं हे मला ठऊक आहे म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असे शिल्पा शिंदेने सांगितले. तसंच राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत अशीही इच्छा तिने बोलून दाखवली. याच पत्रकार परिषदेत प्रियंका गांधी निवडून आल्या असे शिल्पा शिंदे यानी सांगितले. मात्र संजय निरुपम यांनी त्यांची चूक सुधारल्यावर मी आत्ताच राजकारणात आले त्यामुळे मला माफ करा असे शिल्पा शिंदेने म्हटलं आहे.