बाळ जन्माला आले की आई-वडील त्याच्यासोबत सेल्फी काढतात त्या क्षणापासून त्या निरागस जीवाचा तंत्रज्ञानाशी प्रत्यक्ष संबंध सुरू होतो. पुढे ते बाळ मोठे होत असताना आई-वडिलांच्या हातातील मोबाइलकडे झेपावणे, लॅपटॉपच्या स्क्रीनकडे एकटक पाहत राहणे असे नाना प्रकार करू लागते. त्याचे आपल्याला कौतुक वाटते आणि त्याच्या या तंत्रप्रिय वागण्याला योग्य वळण देण्याऐवजी प्रोत्साहन दिले जाते. मग भविष्यात त्याचे तंत्रज्ञानवेड कमी करण्यासाठी अनेक पालकांना विशेष प्रयत्न घ्यावे लागतात. पण जर त्याच्याकडे उपजत असलेल्या तंत्रज्ञान जाणिवेचा सुरुवातीपासूनच योग्य वापर केला तर नक्कीच मुलाच्या विकासात मदत होऊ शकते. शालेय जीवनात साधारणत: पाचवीनंतरच्या विद्यार्थ्यांसाठी विविध तंत्रज्ञानस्नेही शिक्षणाचे पर्याय आहेत. मात्र त्याखालील विद्यार्थ्यांसाठी असे फारसे पर्याय उपलब्ध दिसत नाहीत. सहा ते तेरा वयोगटातील विद्यार्थ्यांची ही गरज आता http://shirsa.in/ / या संकेतस्थळाच्या माध्यमातून पूर्ण होणे शक्य हाणार आहे.

आयसीडब्लूए आणि एमबीएचे प्रशिक्षण घेतल्यानंतर गोरेगाव येथील सुखदा तेंडुलकर अ‍ॅक्सिस बँकेत नोकरीसाठी रुजू झाल्यात. कालांतराने त्यांनी याच बँकेच्या अ‍ॅक्सिस फाऊंडेशनसोबत काम करण्यास सुरुवात केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षकांसाठी विशेष उपक्रम राबविले जात होते. तेथे सुखदाचा शैक्षणिक मजकूर उभा करणाऱ्या समूहाशी जवळून संपर्क आला. त्या वेळेस ती शाळेत असताना जी शिक्षण पद्धती होती तीच आजही असल्याचे तिच्या लक्षात आले. फक्त बदल झाला तो काही शाळा डिजिटल झाल्या इतकाच. मग विद्यार्थ्यांनी लॉजिक क्षमता, भाषेचे कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता अशा विविध क्षमतांचा विकास होण्यासाठी काही तरी करावे या उद्देशाने सुखदा यांनी नोकरी सोडून कंपनीचे सहस्थापक मंगेश देसाई याच्यासोबत ऑक्टोबर २०१३मध्ये ‘शिर्सा’ची सुरुवात केली. सुरुवातीला केवळ शिक्षणातील विविध संकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या गेम्सची निर्मिती करण्यास सुरुवात केली. यामध्ये भाषेचे कौशल्य विकसित होण्यापासून विविध कौशल्य विकसित करणाऱ्या संकल्पना गेम्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या. पण केवळ यावरच न थांबता काही तरी अधिक करणे आवश्यक होते. हे लक्षात घेऊन ब्रिटिश कौन्सिल, नासा स्पेस प्लेस, नॅशनल जीओग्राफिक किड्स, स्टोरीबोट्स, डिस्कव्हरी किड्स अशा विविध आंतरराष्ट्रीय संस्थांशी त्यांच्या शैक्षणिक मजकुराचे कॉपीराइट घेऊन त्यांचे व्हिडीओज आणि माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून मुलांना शिकविणे हा उद्देश नसून शाळा आणि क्लासमधून आल्यावर उरलेल्या वेळात हसतखेळत शिक्षण घेण्याचा मुख्य उद्देश असलयाचे सुखदा सांगते.

या संकेतस्थळावर विविध विषयांशी संबंधित व्हिडीओज उपलब्ध करून दिले आहेत. यावर लॉगइन केलेल्या विद्यार्थ्यांने अमुक एक व्हिडीओ पाहिल्यानंतर किंवा विविध गेम्स खेळल्यानंतर त्याला काही ‘गिक्स’ दिले जातात. हे गिक्स म्हणजे त्याचा वापर संकेतस्थळावरील आभासी जगात पैसे म्हणून होतो. विद्यार्थ्यांने कमावलेल्या गिक्सच्या माध्यमातून ते त्यांचे स्वत:चे आभासी रूप संकेतस्थळावर तयार करू शकतात. या आभासी जगात हे गिक्स वापरून त्यांना त्यांचे विश्व निर्माण करता येते. या विश्वात रमण्यासाठी ते त्यांच्या मित्रांनाही बोलावू शकणार आहेत. तसेच त्या मित्रांसोबत चॅटिंग करणे आदी गोष्टी करणेही त्यांना शक्य होणार आहे. इतक्या लहान मुलांनाही व्यक्त होण्यासाठी समाजमाध्यमावर संधी नसते. मात्र त्यांना त्याबाबत उत्सुकता असते. त्यांची ही उत्सुकता शमविण्याचे काम या संकेतस्थळात होणार आहे. मुलांना या सुविधा उपलब्ध करून देत असताना लहान मुलांसाठीचे सर्व र्निबधांचे काटेकोरपणे पालन करण्यात आल्याचे सुखदा नमूद करते. http://www.planetofgui.com/list/home  हे मुलांसाठीच्या संकेतस्थळ आहे. यावर मुलांच्या शिक्षणरंजनाच्या दृष्टीने विविध कौशल्यविकास संकल्पना आहेत.

भविष्यातील वाटचाल

सध्या या संकेतस्थळावर १०० तासांहून अधिक वेळाचा पन्नासहून अधिक विषयांचा मजकूर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ७५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली असून त्यातील ७० टक्के परत भेट देणारे आहेत. वर्षांला ठरावीक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून शाळांमध्ये उत्पादने विकणे हे आमचे काम सुरू राहणार आहे. मात्र त्याहीपेक्षा भविष्यात कंपनीचे थेट ग्राहक हा विभाग अधिक सक्षम करण्याचा आमाचा मानस असल्याचे सुखदाने सांगितले. यामध्ये सध्या वार्षिक वर्गणीवर मुलांना नोंदणी करता येते. पण लवकरच जसे व्हिडीओ पाहितील तसे पैसे भरणे किंवा अमुक पैशांत इतकी सुविधा, असे पर्याय सुरू करण्याचा विचार असून देशातील शहरांकडून उपनगरांमध्ये पोहोचण्याचा मानस असल्याचेही सुखदाने नमूद केले.

नवउद्यमींना सल्ला

मी स्वत: मराठी असल्यामुळे मराठी नवउद्योजकांना ‘उद्योगात ‘पडू’ नका’ असा सल्ला द्यायला मला आवडेल. उद्योगात सध्या चांगल्या संधी असून तरुणांकडून समाजाला काही तरी नवीन मिळत राहणार आहे. तरुणांच्या संकल्पनांचा आदर करून समाजाने त्यांना प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा सुखदाने व्यक्त केली. तर व्यवसाय सुरू करत असताना आपण सेवा क्षेत्रात जाणार असू तर कोणतीही सेवा देताना त्यातून पैसे कसे कमाविता येतील याचा विचार करा. तसेच उत्पादन क्षेत्रात असाल तर उत्पादन करून त्याचे स्वामित्व हक्क कसे मिळवता येतील याचा प्रयत्न करा. थोडक्यात व्यवसाय करताना कालांतराने त्यातून चांगले पैसे कसे कमाविता येतील याचे ठोकताळे बांधणे आवश्यक असल्याचेही सुखदाने स्पष्ट केले.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

कंपनी सुरू करत असताना सुरुवातीला सुखदाने स्वत:जवळचा निधीची गुंतवणूक केली. २०१३मध्ये खाद्य तंत्रज्ञान आणि ई-व्यापार संदर्भातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जास्त होती. यामुळे मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात गुंतवणूकदार मिळवणे एक आव्हान होते. हे आव्हान पेलून विविध गुंतवणूकदारांना भेटून त्यांना संकल्पना पटवून देऊन ‘अह वेंचर्स’च्या माध्यमातून २५००० अमेरिकन डॉलर्सचा निधी उभा केला. आता लवकरच निधी उभारणीची दुसरी फेरीही पार पडणार आहे. या संकेतस्थळात दोन भाग असून एक भाग हा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यात कंपनी थेट ग्राहकांशी जोडली जाते. यातील ३० टक्के भाग हा मुलांना मोफत उपलब्ध करून दिला आहे. त्याच्यापेक्षा जास्त संकेतस्थळ वापरायचे असेल तर मुलांना त्यासाठी वर्षांला ९९९ रुपये भरून सभासद व्हावे लागते. यानंतर त्यांना १०० टक्के संकेतस्थळ वापरता येते. यातून कंपनीला उत्पन्न होते. तर व्यवसायातील दुसरा भाग हा शाळांशी जोडलेला आहे. विविध कौशल्यांचे शिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमांचे ई-लर्निग मॉडेल्स शाळांमध्ये उपलब्ध करून दिली जातात. यात व्हिडीओसोबत विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिकाही पुरविल्या जातात. यामध्ये शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्यांमागे पैसे घेतले जातात. तर तिसरा उत्पन्नाचा स्रोत हा ब्रॅण्ड्सकडून आहे. बार्बी, हॉटव्हील्ससारखे ब्रॅण्ड कंपनीशी जोडले गेले असून या ब्रॅण्डच्या माध्यमातून विशिष्ट एवढे गिक्स मिळवणाऱ्या मुलांना बक्षिसे दिली जातात. यासाठी ब्रॅण्ड्स कंपनीला पैसे देत असतात.

नीरज पंडित – Niraj.pandit@expressindia.com

@nirajcpandit