वाद आणि नाट्यसमंलेन ही नवीन बाब राहिलेली नाही. ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येत्या १४ जूनपासून मुलुंड येथे भरणार आहे. तत्पूर्वीच आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. माजी आमदार शिशिर शिंदे यांनी नाट्य संमेलनाचे उपाध्यक्ष भाजपाचे खासदार किरीट सोमय्या आणि भाजपाचे आमदार सरदार तारासिंग यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आपल्या फेसबुक पेजवरून त्यांनी सोमय्या आणि सरदार तारासिंग यांच्यावर निशाणा साधला. सदैव मराठीला विरोध करणाऱ्या भामट्यांनी मराठी नाट्यसंमेलनात घुसखोरी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सातत्याने मराठी भाषा आणि मराठी लोकांविरोधात किरीट सोमय्या भूमिका घेतात अशी टीका शिशिर शिंदेंनी  केली आहे. महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात मराठी विषय सक्तीचा केला तेव्हा मराठीविरोधात न्यायालयात धाव घेणारे मराठीद्वेष्टे किरीट सोमय्या हेच आहेत. मराठी विक्रेत्याला रस्त्यावर हाकलणारे हेच सोमय्या परप्रांतिय फेरीवाल्यांबाबत मूग गिळून गप्प बसलेत असा आरोप करत एलफिन्सटन पुलावरील दुर्घटनेत चाकरमनी बळी पडल्यानंतर दांडिया खेळण्यात मग्न असलेल्या सोमय्यांना मराठी माणसाचा हंबरडा ऐकू आला नाही. तेच सोमय्या आता मराठी नाट्यसंमेलनाचे उपाध्यक्ष आहेत, अशा शब्दांत शिंदे यांनी खंत व्यक्त केली आहे. उत्सवी संमेलनांमधून चांगले साहित्य, विचार मंथन किंवा मराठी नाट्यसृष्टीपुढील आव्हाने असे विषय केव्हाच हद्दपार झाले असून नाट्यकर्मींच्या वारीत भामटे शिरले ही मराठीची शोकांतिका असल्याचे त्यांनी म्हटले.

काय म्हटलंय शिशिर शिंदेंनी आपल्या पोस्टमध्ये…


९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुलुंड येथे १४ जून पासून भरणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री श्री. विनोद तावडे या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. हे ठीक आहे.विनोद तावडे ग्रंथप्रेमी आहेत.

पण भाजपाचे मराठी द्वेष्टे खासदार किरीट सोमैया हे नाट्य संमेलनाचे उपाध्यक्ष आहेत.महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षणात मराठी हा विषय सक्तीचा केला तेव्हा मराठी विरोधात न्यायालयात धाव घेणारे किरीट सोमैया हेच आहेत.

मुलुंडच्या संभाजीराजे मैदानात सकाळी ६ ते ९ या वेळेत जाॅगर्सना पारंपारिक आरोग्यदायी ज्यूस पुरवणा-या मराठी विक्रेत्याला मैदानाच्या सीमेवरुन रस्त्यावर हाकलणारे हेच सोमैया महाशय मुलुंड रेल्वे स्थानकालगतच्या महत्त्वाच्या रस्त्यांवर आक्रमण करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांबाबत मूग गिळून गप्प बसलेत.एलफिन्स्टन पुलावरील दुर्घटनेत अनेक चाकरमानी महिला,पुरुष चेंगराचेंगरीत निधन पावले.संपूर्ण मुंबईवर शोककळा असताना त्याच रात्री सोमैया दांडिया खेळले.यांना मराठी माणसाचा हंबरडा ऐकू आला नाही.

१९८५ पासुन नगरसेवक आणि विधानसभेत हॅट्रिक करणारे मुलुंडचे ‘पेव्हरसम्राट’ आमदार सरदार तारासिंह नाट्यसंमेलनाचे सचिव आहेत. सरदार तारासिंह कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात फक्त हिंदीतच बोलतात. तारासिंह यांनी तिकीट काढून एकतरी मराठी नाटक आजपर्यंत पाहिले आहे काय?

सोमैया व तारासिंह एखाद्या मराठी रंगकर्मीच्या मदतीला कधी धावून गेल्याचे एकही उदाहरण सापडत नाही.

सुप्रसिध्द अभिनेते श्री. विजय चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार मिळाला. ‘मुलुंडकर’ विजय चव्हाणांच्या घरी जावून त्यांचे अभिनंदन करण्याचे सौजन्यसुध्दा सोमैया व तारासिंह या जोडगोळीने दाखवले नाही.सर्वात कहर म्हणजे नाट्य संमेलनाचे ठिकाण असलेले कालीदास नाट्यगृह ज्या विभागात येते तेथील स्थानिक नगरसेविका श्रीमती समिता कांबळे यांचे नाव कुठेच नाही(सुज्ञास अधिक सांगणे न लगे).

मराठी नाट्यसंमेलनाच्या आवाहन पत्रिकेत अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचे नाव या निरर्थक राजकारण्यांनंतर ६व्या स्थानावर आहे.

मुलुंड ते विक्रोळी पर्यंतचा परिसर आमच्या आवाक्यात आहे असा दावा संबंधित करतात.या मिरवणा-या सर्व संबंधितांना विजय चव्हाण,पुरुषोत्तम बेर्डे,कमल शेडगे,संजय नार्वेकर,कुमार सोहोनी,लवराज कांबळी,संजीवनी जाधव,केदार शिंदे,सुचित्रा बांदेकर,विजया वाड या रंगकर्मींचा विसर पडू नये म्हणजे झाले.

थोडक्यात साहित्य संमेलन असो किंव्हा नाट्यसंमेलन असो येथे पंचपक्वान्नांच्या किती पंगती ऊठल्या याचाच हिशोब सवंग लोकप्रियतेसाठी केला जातो.ऊत्सवी संमेलनांमधून चांगले साहित्य,विचार मंथन किंवा मराठी नाट्यसृष्टीपुढील आव्हाने असे विषय केव्हाच हद्दपार झाले.नाट्यकर्मींच्या वारीत भामटे शिरले हीच मराठीची शोकांतिका आहे!!!

आपला नम्र,

शिशिर शिंदे