अवयवदानासंबंधी असलेल्या भावनिक, कायदेशीर बाबी तसेच अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेची माहिती देण्यासाठी महानगरपालिकेच्या शीव रुग्णालयाने डॉक्टरांसाठी १९ व २० एप्रिल रोजी कार्यशाळा आयोजित केली आहे.
मेंदू मृतावस्थेत गेल्यानंतर शरीरातील अवयवदानासंबंधी आता जागरुकता वाढत असली तरी अजूनही मरणोत्तर अवयवदानाबाबत भावनिक व कायदेशीर बाबींसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात. याशिवाय अवयवदानासाठी शरीरातून अवयव काढणे व तो गरजू व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करणे, अशा दोन शस्त्रक्रिया कराव्या लागतात. या दोन्ही शस्त्रक्रिया नेमक्या कशा पार पाडाव्यात, अवयव जतन कसे करावे यासंबंधीच्या तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन शीव रुग्णालयाच्या युरोलॉजी विभाग आणि शस्त्रक्रिया विभागाने एकत्रितपणे या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.