शीव रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी असलेल्या एका खोलीच्या छताचा भाग कोसळून एक निवासी डॉक्टर जखमी झाला. मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील या रुग्णालयाकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.
शीव रुग्णालयाच्या आवारात असलेल्या जुन्या बरॅक्समध्ये निवासी डॉक्टरांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. यातील सी १-२ या खोलीच्या छताचा एक भाग मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास पडला. छताच्या सिमेंटचा भाग डोक्यावर पडल्यामुळे खोलीत झोपलेला रेडिऑलॉजी विभागाच्या प्रथम वर्षांचा विद्यार्थी डॉ. ध्रुव शर्मा जखमी झाला. सुदैवाने त्याला फ्रॅक्चर झालेले नाही. या घटनेनंतर निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेने रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पत्र देऊन या घटनेबाबत माहिती दिली.रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे झाडाची एक फांदी बरॅकवर कोसळून छताची काही कौले पडली. यामुळे एक निवासी डॉक्टर किरकोळ जखमी झाला. त्याला चक्कर आल्यासारखे वाटल्याने तो घाबरला होता, परंतु त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले नाही.