अमेरिकेतील पिटसबर्ग शहरात हिंदू जैन देवस्थानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुमारे ७५ भारतीयांनी एकत्र येऊन शिवरायांना मानवंदना वाहिली. केवळ मराठीचं नव्हे, तर इतर भाषिक लोकांनीदेखील मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शिवरायांविषयीचे प्रेम प्रकट केले.

यावेळी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लहान मुलांना भारताचा इतिहास आणि संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी वेषभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात २० मुलं-मुली सहभागी झाली. लहानग्यांनी बाळकृष्ण, राधा, जिजाऊ, झाशीची राणी, निर्मला सीतारामन, भारतीय सैनिक अश्या अनोख्या संस्कारक्षम वेषभूषा करून उपस्थितांची मने जिंकली. श्री. मंगेश खेडीकर आणि सौ. सई पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पहिले.

याचबरोबर शिवाजी महाराजांचे चित्र रंगविण्याच्या स्पर्धेत बालगोपाळांनी उत्सहाने सहभाग घेऊन अप्रतिम चित्रे रंगवून इतिहास जागवला. तर, मंदिराचे सदस्य श्री. राहुल देशमुख यांनी ‘प्रतापगडचा रणसंग्राम’ या विषयावरील स्लाईड शो व कथा सांगून सर्वांच्या मनात शिवरायांबद्दल कुतूहल आणि आदर निर्माण केला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. शशांक श्रीवास्तव यांनी ‘भारतीय हिरो – आदर्श व्यक्तिमत्व’ या विषयावर चर्चासत्र घडवून आणले. श्री. अभिजीत जोशी यांनी देश भक्तिपर गीते गाऊन कार्यक्रमात रंगत आणली.

मंदिराच्या अध्यक्ष्या सौ. सरिता सिंग यांनी मुलांचे कौतुक केले आणि सौ. विभावरी देवी यांच्या हस्ते बक्षिसांचे वाटप करण्यात आले. पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे संचालन श्री. जयेश सेलोकर, तर व्यवस्था श्री. हितेश मेहता यांनी पहिली.