शीव-पनवेल मार्गावरील खारघर येथील टोलनाक्यावरून टोलवसुली करायची की नाही याचा निर्णय महिनाभरात घेण्यात येणार आहे. या मार्गावरील टोलविरोधात विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केल्याने  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आता त्यावर निर्णय घ्यावा लागेल.
मुख्यमंत्र्यांनी सह्य़ाद्री अतिथीगृहात बैठक घेऊन टोलबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली आहे. ही समिती महिनाभरात याबाबतचा अहवाल सादर करणार आहे.
शीव-पनवेल हे ३० मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकाला खारघर येथे टोल भरावा लागणार असल्याने काँग्रेस, भाजप, शेकाप या पक्षांच्या नेत्यांनी आंदोलने केली. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री चव्हाण यांनी संबंधित विभागातील सचिव आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.
खारघर येथील नव्याने उभारला जाणारा टोलनाका हा अव्यवहार्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी  स्पष्ट केले. जनहिताच्या विरोधात सरकार कोणताही निर्णय घेणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
टोलनाका रद्द करणे किंवा स्थानिक वाहनचालकांना या टोलनाक्यातून सवलत मिळावी, अशा दोनही मागणींवर सरकार विचार करणार आहे. शिव-पनवेल रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदाराला कोणत्या अटी-शर्तीवर काम दिले गेले हे तपासणेही महत्त्वाचे आहे. उच्चस्तरीय समिती यासंदर्भात उचित मार्ग काढणार आहे.
    – पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री