दुष्काळग्रस्त भागातील शिवसंपर्क अभियानाला दांडी; खुलासेही टाळले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता यावे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ४० आमदारांना मराठवाडय़ातील निरनिराळ्या जिल्ह्य़ाची पाहणी करण्याच्या मोहिमेवर जाण्याचे आदेश दिले, जोडीला आजी-माजी नगरसेवक, संपर्कप्रमुखांची फौजही दिली. पण ४० पैकी २७ आमदार तेथे पोहोचलेच नाहीत. या प्रकारामुळे खवळलेल्या उद्धव ठाकरे यांनी कानउघाडणी केल्यानंतरही दांडीबहाद्दर आमदारांना काहीच फरक पडलेला नाही. या कामचुकार आमदारांना शुक्रवारी शिवसेना भवनामध्ये येण्याचे फर्मान ठाकरे यांनी सोडले असून आता त्यांचे धाबे दणाणले आहेत.

मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्य़ांमध्ये बिकट परिस्थिती आहे. विक्रीविना तूर पडून आहे, हाती पैसे नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या संधीचा फायदा सावकार घेऊ लागले आहेत.  शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, तूर-सोयाबिनचा प्रश्न, दुष्काळ स्थिती जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसंपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. मराठवाडय़ातील प्रश्न जाणून ते विधानसभेत मांडता यावेत यासाठी आमदारांना या मोहिमेवर पाठविण्याचे निश्चित झाले. त्यासाठी ४० आमदारांची निवडही करण्यात आली. या आमदारांच्या मदतीसाठी मुंबई-ठाण्यातील आजी-माजी नगरसेवक आणि संबंधित जिल्ह्य़ांच्या संपर्कप्रमुखांना तेथे जाण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. मात्र ६-७ मे रोजी मराठवाडय़ातील विविध जिल्ह्य़ांमध्ये आढावा घेण्यासाठी ४० पैकी २७ आमदार गेलेच नाहीत. उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानून आजी-माजी नगरसेवक आणि अन्य पदाधिकारी नेमून दिलेल्या जिल्ह्य़ांमध्ये दाखल झाले. स्थानिक नागरिक, विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था, पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आदींच्या भेटीगाठी घेऊन त्यांनी आपले अहवाल तयार केले आणि ते ठाकरे यांच्याकडे सादर केले.

हे अहवाल हाती पडताच २७ आमदार आणि काही संपर्कप्रमुख मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर गेलेच नाहीत हे उद्धव ठाकरे यांना समजले आणि त्यांनी या सर्वाशी संपर्क साधून त्यांची कानउघाडणी केली. तसेच दौऱ्यावर न गेलेल्या आमदारांना तात्काळ खुलासा देण्याचे फर्मानही शिवसेना भवनातून सोडण्यात आले. मात्र ‘मातोश्री’वर आपले वजन असल्यामुळे २७ पैकी काही आमदारांनी खुलासाही देणे टाळले. नेमून दिलेल्या मोहिमेवर आमदार जात नाहीत आणि त्यानंतर आदेश देऊनही लेखी खुलासाही करीत नाहीत या प्रकारामुळे उद्धव ठाकरे प्रचंड संतापले आहेत. शिवसेनेचा दुसऱ्या टप्प्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा शनिवार, १३ मे रोजी सुरू होत आहे. आमदारांच्या अनुपस्थितीमुळे दौऱ्यात गोंधळ होऊ नये म्हणून दांडीबहाद्दर आमदारांना शुक्रवारी शिवसेना भवनामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पक्षाची शिस्त मोडणाऱ्या या आमदारांवर मोठी आफत कोसळण्याची चिन्हे आहेत.

दुष्काळग्रस्त भागाचा दौरा झाल्यानंतर विधानसभेत आमदारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला अडचणीत आणण्याची व्यूहरचना आखण्यात आली होती. मात्र शिवसंपर्क अभियानांतर्गत पार पडलेल्या पहिल्या टप्प्यातील दौऱ्याला ४० पैकी तब्बल २७ आमदारांनी अनुपस्थिती लावून उद्धव ठाकरे यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावला आहे.