‘भारतमाता की जय’ न म्हणणाऱ्यांनी देशात राहू नये, अशी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानी साहित्यिक, कलावंत, राजकारणी यांना आणि क्रिकेट सामन्यांना पोलिस संरक्षण देण्याची भूमिका घेतली होती, तेव्हा देशभक्ती कुठे गेली होती, असा सवाल करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे. त्याचबरोबर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याविरुध्द कारवाई करण्याची मागणीही राऊत यांनी केली आहे.

दहशतवादी कारवाया सुरु असेपर्यंत पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारे चर्चा करु नये आणि संबंध ठेवू नयेत, अशी शिवसेनेची नेहमीच भूमिका राहिली आहे. पण पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री कसुरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन, प्रसिध्द गझलगायक गुलाम अली आणि अन्य कलावंतांचे कार्यक्रम व क्रिकेट सामन्यांसाठीही पोलिस संरक्षण देण्याची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली होती. त्या वादात ऑब्जव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांना काळेही फासण्यात आले होते. भाजपने पाकिस्तानबाबत भूमिका घेतानाही देशभक्तीची आठवण ठेवावी, अशी टिप्पणी राऊत यांनी केली आहे.