News Flash

गांधी परिवाराला धोका कमी झाला हे नक्की कोणाला वाटतं ?; शिवसेनेचा सवाल

इंदिरा गांधी या पंतप्रधान पदावर असताना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची हत्या केली.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या गांधी कुटुंबातील तीनही सदस्यांची एसपीजी कमांडोंची सुरक्षाव्यवस्था केंद्र सरकारने काढून घेतली असून केंद्रीय राखीव पोलिसांचा समावेश असलेली झेड प्लस सुरक्षा त्यांना पुरवण्यात आली आहे. ‘आयबी’ आणि ‘रॉ’ या गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गांधी कुटुंबाच्या जिवाला असणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत आढावा घेतल्यानंतरच सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणं होतं. आता यावर शिवसेनेनं सवाल उपस्थित केला आहे. गृहमंत्रालयाने असे ठरवले की, गांधी परिवाराला असलेला धोका कमी झाला आहे. गृहमंत्रालयास वाटते म्हणजे नक्की कुणास वाटते? असं म्हणत शिवसेनेनं अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिल्ली असेल किंवा महाराष्ट्र, वातावरण निर्भय असावे, सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांना बेडरपणे काम करता यावे असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. तशी स्थिती व वातावरण निर्माण झाले असेल तर गांधी परिवाराची सुरक्षा काढायला हरकत नाही. पण पंतप्रधान, गृहमंत्री, मंत्री व इतर सत्ताधारी पुढारी सुरक्षा ‘पिंजरे’ सोडायला तयार नाहीत व बुलेटप्रूफ गाडय़ांचे महत्त्व कमी झालेले नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. आपल्या सामनाच्या संपादकीयमधून शिवसेनेनं याद्वारे अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. गांधी कुटुंबाच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या प्रश्नास आधार आहे. गांधी परिवाराच्या सुरक्षा ताफ्यात जुन्या गाड्या पाठवल्याच्या बातम्याही चिंताजनक आहेत. धोक्याची घंटा वाजत असेल तर पंतप्रधान मोदी यांनी त्यात लक्ष घातले पाहिजे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?
गांधी परिवाराचे ‘एसपीजी’ कवच हटवून त्यांना ‘झेड प्लस’ वगैरे सुरक्षा व्यवस्था दिली आहे. इंदिरा गांधी या पंतप्रधान पदावर असताना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांची हत्या केली. खलिस्तानी अतिरेकी सुवर्ण मंदिरात घुसले होते व स्वयंघोषित संत भिंद्रनवाले याने सुवर्ण मंदिरातून देशाविरुद्ध युद्ध पुकारले होते. भिंद्रनवालेस पाकिस्तान आणि चीनचा उघड पाठिंबा होता. इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात रणगाडे घुसवून भिंद्रनवालेचा पाडाव केला. त्याचा बदला म्हणून इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. राजीव गांधी यांना तामीळ अतिरेक्यांनी मारले. तामीळनाडूतील एका प्रचारसभेत या उमद्या नेत्यास निर्घृणपणे मारले गेले. त्यामुळे गांधी परिवारास नंतर विशेष सुरक्षा व्यवस्था देण्यात आली. मात्र आता गांधी परिवारास धोका नसल्याचे कारण देत सरकारने ही सुरक्षा कमी केली.

खाद्याच्या जिवाशी खेळू नये व सुरक्षा व्यवस्थेचा खेळखंडोबा करू नये. ‘गांधी’ परिवाराच्या जागी इतर कोणी असते तरी आम्ही यापेक्षा वेगळी भूमिका मांडली नसती. इंदिरा गांधी यांचे हौतात्म्य आहेच. तसे राजीव गांधी यांचेही बलिदान आहे. राजीव गांधी यांनी श्रीलंकेशी शांती करार केला तेव्हाच त्यांच्या जीवितास धोका असल्याचा इशारा शिवतीर्थावरील सभेतून देणारे शिवसेनाप्रमुखच होते. त्यांनी केलेल्या शांती कराराबाबत मतभेद होतेच, पण शेवटी तो करार करण्यामागे तेव्हाच्या सरकारची एक भूमिका होती. प्रश्न इतकाच आहे की, ही सर्व पार्श्वभूमी असताना गांधी परिवाराची सुरक्षा व्यवस्था सरकारने काढून घेतली व त्यावर आवाज उठवणाऱ्यांना संसदेत बोलू दिले गेले नाही. इंदिरा गांधी या एका पक्षाच्या नव्हत्या. त्या राष्ट्राच्या होत्या हे ज्यांना मान्य आहे त्या सगळय़ांनी ही बाब गंभीर म्हणून स्वीकारायला हवी.

फक्त कश्मीरच्या सीमेवरील सैनिक आजही बेडरपणे छातीवर गोळय़ा झेलत भारतमातेसाठी हौतात्म्य पत्करीत आहेत. गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना वरच्या श्रेणीची सुरक्षा व्यवस्था देण्यात आली. विरोधकांची सुरक्षा काढायची व सत्ताधारी मंडळाच्या लोकांना द्यायची. कुणी उत्तर प्रदेशचा निवडणूक प्रभारी झाला म्हणून त्याला सुरक्षा दिली जाते. कुणी महाराष्ट्राचा प्रभारी झाला तर कुणी अन्य राज्य जिंकायला नेमण्यात आला म्हणून त्यांस ‘झेड प्लस’ वगैरे सीआरपीएफचे विशेष सुरक्षाकवच पुरवले जाते. हा राजकीय सत्तेचा गैरवापर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 8:11 am

Web Title: shiv sena about gandhi family security removal criticize bjp amit shah jud 87
Next Stories
1 हैदराबादमध्ये महिलेला जाळल्याप्रकरणी चौकशी
2 माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कुमारस्वामी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा
3 लंडन ब्रिजवर हल्ल्यात अनेक जण जखमी
Just Now!
X