देशात सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरुन एकीकडे विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका सुरू असताना एनडीएतील सहकारी शिवसेनेनेही भाजपावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणूक प्रचारात दिलेल्या ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाची आठवण करुन देताना मुंबईच्या रस्त्यांवर पोस्टर लावले आहेत.


शिवसेनेकडून मुंबईच्या रस्त्यांवर ‘अच्छे दिन’च्या शिर्षकाखाली पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर २०१५ तील इंधनाचे दर आणि २०१८ मधील इंधानाच्या दरांमधील फरक मांडण्यात आला आहे. त्यासोबत हेच का ते अच्छे दिन असा बोचरा सवाल करण्यात आला आहे.

‘बहूत हुई पेट्रोल-डिझेल की मार’, ‘अब की बार मोदी सरकार’, आणि ‘अच्छे दिन, आयेंगे’, असे म्हणत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने देशातील जनतेला इंधन दरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य माणूस कसा त्रस्त आहे, हे दाखवण्यासाठी भाजपने देशभरात ‘बॅनरबाजी’ केली होती. भाजपाने मुंबईतील अनेक भागात ‘अच्छे दिन, आयेंगे’,चे बॅनर लावले होते. भाजपाला याची आठवण करून देत शिवसेनेने बॅनर लावले असून ‘हेच का अच्छे दिन?’, असा सवाल भाजपला विचारला आहे.

दरम्यान. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत आज पुन्हा १२ पैशांची तर डिझेलच्या दरात ११ पैशांची वाढ झाली आहे. परिणामी, पेट्रोलचा आजचा दर ८७.८९ रू. प्रतिलिटर तर डिझेल ७७.०९ रू. प्रतिलिटर झाला आहे. तर, राजधानी दिल्लीत आज पेट्रोलचा दर ८०.५० रुपये आणि डिझेलचा दर ७२.६१ रु. प्रतिलिटर झाला आहे. काल पेट्रोल ४८ पैशांनी तर डिझेल ५५ पैशांनी महागलं होतं, त्यामध्ये आज पुन्हा भर पडल्याने मोठा फटका सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. राज्यातील परभणीमध्ये पेट्रोलसाठी सर्वात जास्त पैसे मोजावे लागत असून येथे तर पेट्रोलने नव्वदी ओलांडली आहे. दुसरीकडे, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलची केलेली प्रचंड दरवाढ, गगनाला भिडलेली महागाई, त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष इत्यादी पक्षांनी महाराष्ट्र बंद करण्याचे जाहीर केले आहे.