शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे ‘बुलेट ट्रेन’ ला ब्रेक?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेला फारशी किंमत देत नसल्याने  थेट ‘मातोश्री’वरुन आदेश आल्याने मंत्र्यांनी आक्रमक पवित्रा  घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत रणकंदन केले आणि शिवसेनेचे मंत्री बैठकीतून बाहेर पडले. शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांविरोधातील राग उफाळून आला. बुलेट ट्रेनला ब्रेक लावत फेरीवाला विभाग योजनेलाही जोरदार विरोध केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेल्या या मतभेदांमुळे आता मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होऊन मार्ग काढला जाणार आहे.

शिवसेना मंत्र्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला तूर्तास ब्रेक लागला असून याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीकडे सोपविण्यात आला. फेरीवाला योजना व पालकमंत्र्यांच्या जबाबदारीचे वाटप यावरुनही शिवसेना नेते आक्रमक राहिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरमाईचा सूर आळवीत बुलेट ट्रेन व फेरीवाला योजनेतील मुद्दे उपसमितीकडे सोपविले.

शिवसेनेला निर्णयप्रक्रियेत सहभागी केले जात नाही, ठाकरे यांना सन्मान दिला जात नाही, याबाबतचा शिवसेनेचा संताप मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत उफाळून आला. यवतमाळचे पालकमंत्रीपद बदलल्याने संतापलेले महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सकाळीच मातोश्री हे ठाकरे यांचे निवासस्थान गाठले. त्यानंतर लगोलग चक्रे फिरली व आदेश दिले गेले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांविरोधात शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्रमक होऊन त्यांच्या प्रस्तावांमध्ये अडथळे आणले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘बुलेट ट्रेन’ ला जोरदार विरोध केला आहे. याप्रकल्पासाठी सुमारे ९८ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असून त्याऐवजी काही रक्कम उपनगरी प्रवाशांवर खर्च केल्यास सुमारे ७८ लाख प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी भूमिका घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व भाजपकडून शिवसेनेच्या विरोधाला फारशी किंमत दिली जात नसल्याने शिवसेनेचे मंत्री मंगळवारी आक्रमक पवित्र्यामध्ये होते. बुलेट ट्रेनसाठी राज्य सरकार, रेल्वे, गुजरात सरकार यांच्यात सामंजस्य करार होणार असून ‘विशेष उद्दिष्ट वाहन’ (स्पेशल पर्पज व्हेईकल) तयार करण्यात येणार आहे.मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्याला या प्रकल्पाचा किती फायदा आहे, किती प्रवाशांना याचा लाभ होईल, आदी मुद्दे उपस्थित केले.

पालकमंत्रिपदांवरुनही नाराजी

शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांचे यवतमाळचे पालकमंत्रीपद बदलल्याने शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेला विश्वासात घेतले जात नसून परस्पर निर्णय राबविले जातात. युतीचे सरकार असताना ही कार्यपध्दती योग्य नसल्याची कैफियत त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे मांडली.