महायुतीतील घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (रिपाइं) जागावाटपात योग्य स्थान मिळाले पाहिजे, या रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आग्रही भूमिकेचा मान राखून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या तीन जागा देण्याची तयारी दाखवल्याचे रिपाइंचे प्रवक्ते अर्जुन डांगळे यांनी शुक्रवारी सांगितले. मात्र राज्यसभेची एक जागा देण्याच्या मागणीवर सेनेने भाजपकडे बोट दाखवून जबाबदारी ढकलल्याचे समजते.
रिपाइंच्या राज्यव्यापी मेळाव्यात रामदास आठवले यांनी सेना- भाजपकडून जागावाटपाबाबत सुरू असलेल्या वेळकाढू धोरणाचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी ‘मातोश्री’वर आठवलेंनी उद्धव यांची भेट घेऊन जागावाटपाबाबत चर्चा केली. या वेळी खासदार संजय राऊत हेही उपस्थित होते. रिपाइंला लोकसभेच्या तीन जागा देण्यात येतील. यातील एक शिवसेना व दोन भाजपच्या कोटय़ातील असतील, असे डांगळे यांनी सांगितले. राज्यसभेसाठी भाजपच्या कोटय़ातून जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सेनेच्या वतीने देण्यात आल्याचे सांगण्यात येते.