देशभरात जीएसटी अर्थात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे मुंबईच्या वेशीवरील जकात नाके बंद पडले आहेत. नाक्यांवरील अधिकारी आणि पोलिसांना हटवण्यात आले आहे. बंदोबस्त नसल्यामुळे मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील सुरक्षेलाच भगदाड पडले आहे. त्यामुळे जीएसटीचा जल्लोष करणाऱ्यांनी मुंबईत दुसरा एखादा कसाब घुसणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असा सल्ला शिवसेनेने भाजपला दिला आहे.

जीएसटीमुळे मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील जकात नाके बंद झाले आहेत. त्यामुळे मुंबईच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रक काढून भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मुंबईसह देशभरात जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे जकात नाक्यांवरील वसुली थांबवण्यात आली आहे. जकात नाक्यांवरील बंदोबस्त हटवण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत दिवसाढवळ्या प्रवेश करणे दहशतवाद्यांसाठी सोपे झाले आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील सुरक्षेलाच भगदाड पडले आहे. त्यामुळे कुणीही घुसून घातपात घडवू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेच्या पाठिंब्याने संसदेत जीएसटी विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. मुंबई महानगरपालिकेची आर्थिक घडी विस्कटू नये, यासाठी विधेयकात आवश्यक त्या तरतुदी शिवसेनेने करुन घेतल्या आहेत. मात्र जकात नाक्यांवरील बंदोबस्त हटवण्यात आल्यामुळे मुंबईतील सुरक्षेलाच भगदाड पडले आहे. हे भगदाड बुजवण्यासाठी तातडीने ठोस उपाय करायला हवेत. जीएसटीचा जल्लोष करणाऱ्यांनी मुंबईची काळजी घ्यावी. मुंबईत दुसरा एखादा कसाब घुसणार नाही याची खबरदारी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.