उस्मानाबाद जिल्हा परिषदेत पुतण्याला उपाध्यक्ष करण्यासाठी भाजपला साथ देत बंडाचे निशाण फडकवणारे शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात सोलापूर-उस्मानाबादमधील शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे सावंत यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. दोन्ही जिल्ह्य़ांतील सावंत यांच्या मर्जीतील पक्ष पदाधिकाऱ्यांना बदलून जुन्या शिवसैनिकांना संधी देण्याचा निर्णय शिवसेना नेतृत्वाने घेतल्याचे समजते.

सरकार स्थापन झाल्यावर पुन्हा मंत्रीपद मिळेल, असा तानाजी सावंत यांना विश्वास होता. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे तानाजी सावंत यांनी ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदासाठी पुन्हा  येणार नाही, असा इशारावजा निर्धार व्यक्त केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना जय महाराष्ट्र केल्याची चर्चा रंगली होती. यानंतर मागील आठवडय़ात उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी भाजपला अध्यक्षपदासाठी साथ देत पुतण्या धनंजय सावंत यास उपाध्यक्ष करत शिवसेनेला धक्का दिला.

तानाजी सावंत यांच्या या बंडाच्या भूमिकेमुळे शिवसेना नेतृत्वासह उस्मानाबाद-सोलापूर येथील शिवसैनिकांत नाराजी पसरली. सावंत यांच्या मंत्रिपदासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे लक्ष्मीकांत पाटील यांना जिल्हाप्रमुखपदावरून दूर करत माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली.

शनिवारी तानाजी सावंत यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीवर धाव घेत तक्रारींचा पाढा वाचला. विधानसभा निवडणुकीत सावंत यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे पक्षाला फटका बसल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

पक्षसंघटनात्मक चर्चा करण्यासाठी बैठक झाली. तानाजी सावंत यांच्यावर कारवाईबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. केवळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्याचे ठरले आहे. सावंत यांची प्रकृती बरी नसल्याने ते बैठकीस नव्हते. ते काही दिवसांनी येऊन भेटणार आहेत.

–  विनायक राऊत,