के-पूर्व प्रभाग अध्यक्षपदाचा पेच मात्र कायम

मुंबई महापालिकेच्या के-पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदावरून निर्माण झालेला वाद सत्तेच्या मुळावर येण्याच्या धास्तीने शिवसेना-भाजपने पुन्हा एकदा हातमिळवणी केली असून त्यामुळे स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी निर्वेधपणे पार पडली. मात्र के-पूर्व प्रभाग समितीचे अध्यक्षपद कोणाच्या वाटय़ाला येणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित राहिला आहे.

वैधानिक आणि विशेष समित्यांच्या निवडणुकांमुळे पालिकेतील वातावरण तापू लागले आहे. शिवसेनेने स्थायी समिती आणि शिक्षण समिती आपल्याकडे ठेवली असून सुधार समिती, बेस्ट समिती भाजपला दिली आहे. भाजपला के-पूर्व प्रभाग समितीचे अध्यक्षपद हवे होते.प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्या विरोधात भाजपनेही आपले उमेदवार उभे केले. त्यामुळे युती तुटण्याची चिन्हे निर्माण झाली होती. स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट निर्माण होऊन त्याचे पडसाद राज्य सरकार आणि पालिकेतील सत्तेवर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने उभय पक्षांतील नेत्यांनी वादावर पडदा टाकला.

यशोधर फणसे विजयी

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार यशोधर फणसे १४ मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे यांना ८ मते मिळाली. यावेळी मनसेचे तीन नगरसेवक अनुपस्थित होते, तर सपच्या नगरसेवकाने तटस्थ भूमिका घेतली.भाजप नगरसेवक दिलीप पटेल यांच्याविरुद्धचे एक प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला.

 हेमांगी वरळीकर विजयी

शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार हेमांगी वरळीकर यांनी काँग्रेसच्या प्रियतमा सावंत यांचा पराभव केला. वरळीकर यांना १५, तर सावंत यांना सहा मते मिळाली.