विधान परिषद निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण

विधान परिषदेच्या सहा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. यापुढे सर्व स्तरावर स्वबळावर निवडणुका लढविण्याची भाषा करणारी शिवसेना आणि युतीसाठी धडपडणाऱ्या भाजपने ‘अळीमिळी’ पाळत एकमेकांशी जुळवून घेतले आहे. सहापैकी तीन-तीन जागा वाटून घेऊन भाजप-शिवसेनेची अघोषित युती झाली आहे. तर दुसरीकडे, लातूर मतदारसंघावरून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाड निर्माण झाला आहे.

या निवडणुकीत उमेदवारीसाठी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे रमेश कराड यांना पक्षात घेऊन लातूरमधून उमेदवारी दिली आहे. नाशिकमधून शिवसेनेचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांच्या गळ्यात राष्ट्रवादीने उमेदवारीची माळ घातली आहे. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना लातूरमधून उमेदवारी देण्याचे भाजपने निश्चित केले आहे. ते गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत आघाडी करण्याचे ठरविले होते. परंतु राष्ट्रवादीने लातूरमधून आपला उमेदवार उभा करून काँग्रेसला चांगलाच झटका दिला आहे. काँग्रेस ही जागा सोडायला तयार नाही, त्यामुळे आकाराला येण्याआधीच आघाडी बिघडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर अद्याप कोणत्याही प्रकारची आघाडी झाली नाही, असे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. लातूर मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली असली, तरी काँग्रेसनेही ही जागा लढविण्याची तयारी केली असून, पक्षाचा अधिकृत उमेदवार गुरुवारी जाहीर करून उमेदवारी अर्जही भरला जाईल, असे पक्षातील सूत्राकडून सांगण्यात आले.

शिवसेनेने परस्पर तीन उमेदवार जाहीर करून टाकल्यानंतर उरलेल्या तीन जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेत भाजपने विदर्भातील दोन व मराठवाडय़ातील उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघातून उमेदवार निश्चित केले. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना यांच्यातील थेट संघर्ष टळला असून सेनेशी जागावाटपाची चर्चा टाळूनही भाजपने युती कायम राखल्याचे चित्र समोर आले आहे.