25 February 2021

News Flash

युतीबाबत सेना नेत्यांमध्ये संभ्रम

सर्व ४८ मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याचे नियोजन

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

सर्व ४८ मतदारसंघांमध्ये मेळावे घेण्याचे नियोजन

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्याबाबत शिवसेना संभ्रमात असल्याचे चित्र शनिवारी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतून स्पष्ट झाले. भाजपशी युती करावी की स्वतंत्र लढावे, याबाबतची रणनीती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यानंतर ठरवावी, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेशी युती करण्याची इच्छा व्यक्त करणारा भाजप स्वबळावर निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारीही करत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानंतर राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेळावे घेण्याच्या सूचना अनेक नेत्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली, परंतु याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख दसरा मेळाव्यानंतर घेतील.

शिवसेनेचा दसरा मेळावा आणि निवडणुकीच्या रणनीतीबाबत उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीस परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, कृपाल तुमाने, दगडू सकपाळ, अरविंद नेरकर, विश्वनाथ नेरुरकर उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांनी निवडणुकांना कसे सामोरे जायचे, याबाबत नेत्यांची मते विचारण्याबरोबरच उमेदवार निश्चित करण्याबाबतही चर्चा केली. त्यावर एका खासदाराने काही जागांचे उल्लेख करत आपल्याकडे त्या जागांवर उमेदवार नसल्याचे ठाकरे यांच्या निदर्शनास आणले. त्यावर, भाजप युतीची बोलणी करतो आणि त्याचवेळी सर्व जागा लढण्याची तयारीही करतो. असे असताना आपल्यालाच उमेदवारांचा प्रश्न का भेडसावतो, असा प्रश्न उद्धव यांनी केला. त्यावर दसरा मेळाव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी सर्व ४८ मतदारसंघांत मेळावे घ्यावेत. त्यातून शिवसेनेची सर्व जागा लढण्याची तयारी आहे, असा संदेश जाईल. भाजपने युतीचा प्रस्ताव दिलाच तर अंतिम निर्णय पक्षप्रमुखांनी घ्यावा, अशी सूचना दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदम यांनी केली.

तर युती नाहीच, स्वबळावरच शिवसेना लढणार हे स्पष्ट करूनच मेळावे घ्यावेत, अशी सूचना संजय राऊत यांनी केली. राज्यातील सर्व खासदारांशी ठाकरे यांनी स्वतंत्रपणे बोलून युतीबाबत त्यांचे मत जाणून घ्यावे, अशी सूचना मिलिंद नार्वेकर यांनी केली.

दसरा मेळाव्यात शिवसेनेची ताकद दाखवण्याच्या दृष्टीने राज्याच्या सर्व भागांतील शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने मुंबईत यावे याचे चोख नियोजन करण्याची जबाबदारी त्या भागातील मंत्री, खासदार-आमदार यांच्यावर टाकण्यात आली.

मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आयत्यावेळी भाजपने युती तोडली होती. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्या पक्षाचे नेते युतीची इच्छा व्यक्त करत असले तरी मागचा अनुभव लक्षात घेऊनच शिवसेनेलाही विचार करावा लागेल आणि तयारी ठेवावी लागेल. त्यादृष्टीनेच पक्ष तयारी करत आहे.    – डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना प्रवक्ता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 12:37 am

Web Title: shiv sena bjp alliance 4
Next Stories
1 बांधकामाच्या ठिकाणी आराखडा प्रदर्शित करणे बंधनकारक!
2 नवी मुंबई : वाशीमध्ये पादचारी पुल कोसळला; कोणतीही जीवितहानी नाही
3 पवारसाहेब जो निर्णय घेतील तो मान्य – उदयनराजे भोसले
Just Now!
X