मुंबई : भाजप आणि शिवसेनेतील कटुतेमुळे राज्यात लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढतीत चांगल्या जागा मिळतील ही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची अटकळ फोल ठरण्याची शक्यता आहे. युती आणि आघाडी अशा थेट लढतीत भाजप-शिवसेना युतीचा वरचष्मा राहील, अशी एकूण चिन्हे आहेत.

काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आल्यानेच भाजपने युतीसाठी पुढाकार घेतला. एक पाऊल मागे टाकले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली असती तर ते आघाडीच्या पथ्यावर पडले असते. हिंदुत्ववादी मतांमध्ये होणारे विभाजन आघाडीला नक्कीच फायदेशीर ठरले असते. स्वतंत्रपणे लढल्यास भाजप आणि शिवसेना दोघांचेही नुकसान होऊ शकते, अशी कबुलीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे दिली होती. भाजप आणि शिवसेनेतील कलगीतुरा आणि शिवसेनेची आक्रमक भूमिका लक्षात घेता युतीचे बिनसेल, अशी शक्यता आघाडीच्या नेत्यांची होती.

भाजप आणि शिवसेना एकत्र आल्याने आधी अपेक्षित धरलेले यश मिळणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी सोपे नाही. शहरी भागांमध्ये भाजप आणि शिवसेनेला चांगला पाठिंबा मिळतो. याशिवाय पगारदार नोकरवर्ग आणि मध्यमवर्गीय हा भाजप-शिवसेनेला साथ देतो. ग्रामीण भागातही भाजपने गेल्या साडेचार वर्षांत हातपाय पसरले असल्याचे जिल्हा परिषदा, नगरपालिकांच्या निकालांवरून स्पष्ट झाले. मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे या समाजाची चांगल्या प्रमाणात मते युतीला मिळू शकतात. हे सारे मुद्दे लक्षात घेतल्यास भाजप आणि शिवसेनेचा वरचष्मा राहू शकतो. अर्थात, भाजप आणि शिवसेनेत मतांचे हस्तांतरण कशा प्रकारे होते हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपने गेल्या साडेचार वर्षांत शिवसेनेचे पूर्णपणे खच्चीकरण केले आणि गरज भासल्यावर मदतीसाठी हात पुढे केला. अशा वेळी भाजप उमेदवार असतील तेथे शिवसेनेची मते भाजपला मिळतील का, हा प्रश्न आहे. ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. त्यांना तुरुंगात डांबण्याची भाषा केली होती. याच सोमय्या यांना शिवसैनिक मतदान करण्याची सुताराम शक्यता नाही. मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे या मुद्दय़ावर भाजपची मते शिवसेना उमेदवारांना मिळतील, पण शिवसेनेची किती मते भाजपच्या उमेदवारांना मिळतील याबाबत साशंकताच व्यक्त केली जाते.

भाजप-शिवसेना युतीमुळे मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरी किंवा निमशहरी भागांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसमोर युतीचे आव्हान असेल. १९९८ मध्ये युती सत्तेत असतानाही राज्यात काँग्रेसने ३८ जागा जिंकल्या होत्या याकडे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लक्ष वेधले असले तरी तेव्हा रमाबाई नगरमधील गोळीबाराची पाश्र्वभूमी होती.

विधानसभेच्या जागावाटपात भाजपची खेळी?

विधानसभेसाठी मित्र पक्ष वगळता ऊर्वरित जागांचे समसमान जागावाटप करण्याचे सूत्र भाजप आणि शिवसेनेत ठरले आहे. सध्याच्या व्यवस्थेत रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम, सदाभाऊ खोत यांची रयत शेतकरी संघटना हे मित्र पक्ष भाजपचे सहयोगी आहेत. शिवसेनेचा एकही मित्र पक्ष नाही. नवीन मित्र जोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहेच. या साऱ्या मित्र पक्षांना २५ ते ३० जागा सोडाव्या लागतील. कदाचित शिवसेनेच्या जागा कमी करण्याकरिता अधिकही जागा सोडल्या जाऊ शकतात. या जागा सोडल्यावर उर्वरित जागांचे समसमान वाटप केले जाईल. शिल्लक २५० ते २६० जागांचे समसमान म्हणजे १२५ ते १३० जागा असे वाटप करावे लागेल. भाजपचे सध्या १२२ आमदार आहेत. म्हणजे भाजपच्या वाटय़ाला विजयी जागा वगळता गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जास्त जागा मिळणार नाहीत. उद्या मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा आल्यास मित्र पक्ष आपल्या बाजूने उभे राहतील अशी व्यवस्था भाजपकडून केली जाऊ शकते.

युती मनसे एकत्र

मधल्या काळात काही मतभेद झाले पण आता भाजप-शिवसेना मनसे एकत्र आले आहेत. अर्थात मनसे म्हणजे तुमच्या मनात आहे ते नाही तर स्वच्छ मनाने-दिलसे असे विधान मुख्यमंत्र्यांनी करताच एकच हशा उसळला. तोवर गंभीर चेहऱ्याने बसलेल्या उद्धव ठाकरे यांनाही हसू आवरले नाही.

मुंबईकरांना दिलासा

मुंबईत ५०० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या सर्वसामान्यांना मालमत्ता करात माफी देण्याची शिवसेनेची मागणी आहे.राज्य सरकार त्यास मान्यता देईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.

उपमुख्यमंत्रीपदाचे संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील जागा वाटपासाठी निम्म्या जागांचे आणि सत्ता आल्यावर दोघांना महत्त्वाच्या मंत्रिपदांचे समान वाटप हे सूत्र सांगितले. त्यामुळे  दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवणाऱ्या पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळेल, असेच संकेत दिल्याचे मानले जाते. मात्र आदित्य ठाकरे यांनी सत्तापदाचे समान कालावधीसाठी वाटप होईल, असे ट्विट केल्याने अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद सेनेला हवे आहे, असा संदेश गेला.

अन् किरीट सोमय्या निघून गेले

युतीच्या घोषणेच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहण्यासाठी खासदार किरिट सोमय्या आले आणि नेत्यांसाठी व्यासपीठाच्या उजव्या बाजूला खाली ठेवलेल्या खुच्र्यावर पहिल्या रांगेत बसले. मात्र, उद्धव ठाकरे यांचे आगमन होण्याआधीच त्यांना एकाने आत बोलवून नेले काही निरोप दिला. त्यानंतर सोमय्या सभागृहातून निघून गेले. मुंबई  पालिका निवडणुकीवेळी सोमय्या यांनी पालिकेतील भ्रष्टाचारावरून ठाकरे कुटुंबावर हल्ला चढवला होता. त्यामुळे युतीची घोषणा होत असताना सोमय्या पहिल्या रांगेत बसलेले उद्धव यांना आवडणार नाही या कारणास्तवच सोमय्या यांना ‘निरोप’ देण्यात आल्याची चर्चा नंतर रंगली होती.

दुष्काळी भागात एकत्र दौरा

राज्य सरकार दुष्काळासाठी काम करत आहेच. पण भाजप व शिवसेनेचे नेते-मंत्री पक्षपातळीवर दुष्काळी भागात एकत्र जातील आणि काम करतील. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त दौऱ्याची आखणी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मधल्या काळात दोन्ही पक्षांत वाढलेली कटुता संपवण्यासाठी या दौऱ्यांचा उपयोग होणार आहे.

मनसेला फायदा?

’भाजप-शिवसेना युतीचा मनसेला राजकीय फायदा होऊ शकतो. भाजपबरोबर केलेली युती अनेक कडव्या शिवसैनिकांना मान्य झालेली नाही. भाजपने पाच वर्षे सातत्याने अपमान केला आणि गरज होती तेव्हा मदत घेतली, अशी शिवसैनिकांची व्यथा आहे.

’शिवसेनेची किती मते भाजपकडे वळतील हा प्रश्नच आहे. यापेक्षा शिवसेनेची काही प्रमाणात मते मनसेकडे वळू शकतात. कारण भाजपपेक्षा शिवसैनिकांना मनसे किंवा राज ठाकरे अधिक जवळचे वाटतात.

’ याशिवाय शिवसेनेच्या विचारांचे अथवा कुंपणावरील मतदार भाजपपेक्षा मनसेला मते देऊ शकतात. युती झाल्याने शिवसेनेची सर्वच मते भाजपकडे वळतील असे नाही.

’ही मते राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात, पण काँग्रेसला मिळू शकणार नाहीत. अशा परिस्थितीत विधानसभेला ही मते मनसेकडे जाऊ शकतात.

भाजप-शिवसेनेची युती म्हणजे राफेल चोर व सत्तेसाठी लाचार असणाऱ्यांची हातमिळवणी झाली आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने भाजपच्या भ्रष्ट मंत्र्यांवर एक पुस्तिका काढली होती, आज त्या पुस्तिकेच्या पानांची कागदी फुले तयार करून त्याचे तोरण अमित शाह यांच्या स्वागतासाठी मातोश्रीच्या दारावर लावले.

 – अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

भाजपने सक्त वसुली संचालनालयाची (ईडी) भीती दाखवून उद्धव ठाकरे यांना युती करण्यास भाग पाडले. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यंत आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत युतीची चर्चा नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. मग कशाच्या आधारावर ठाकरे यांनी युतीला होकार दिला, ते जाहीर करावे.

 – राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते

भाजप आणि शिवसेना युती झाली तरीही राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चांगले यश मिळेल. मोदी सरकारच्या धोरणांमुळे राज्यातील सामान्य नागरिक भाजपला विटला आहे. भाजपने शिवसेनेचा फार वाईट अपमान केला आहे. हे शिवसेनेचे कार्यकर्ते विसरलेले नाहीत. एकूणच युतीमुळे आघाडीच्या यशावर परिणाम होणार नाही.

– जयंत पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष.

शिवसेनेचे  बदल ते  रंग . . .

२३ जानेवारी २०१८

‘एकला चलो रे’ उद्धव ठाकरे यांची स्वाभिमानी भूमिका

२६ जानेवारी २०१७

* युतीत शिवसेनेची २५ वर्षे सडली, युतीसाठी कोणाकडे कटोरा घेऊन जाणार नाही – उद्धव ठाकरे

* भाजपबरोबर युती केल्याने शिवसेनेची २५ वर्षे सडली. युतीसाठी मी कोणापुढेही कटोरा घेऊन जाणार नाही. यापुढे भाजपशी कदापीही करणार नाही. शिवसेना आता स्वबळावरच राज्याची आणि महानगरपालिकेची सत्ता हस्तगत करेल.

* मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी झालेल्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीत शिवसेनेची २५ वर्षे सडली, असा सूर लावला होता. युतीत शिवसेना सडली, असे मत ठाकरे यांनी मांडले होते तरीही त्यानंतर दोन वर्षे केंद्र व राज्याच्या सत्तेत शिवसेना भाजपच्या मांडीला मांडी लावून बसली होती. आता तर युतीच केली आहे. २५ वर्षे युतीत सडली हे विधान उद्धव ठाकरे बहुधा विसरले असावेत, असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला आहे.

 

२४ डिसेंबर २०१८, पंढरपूर

*पहारेकरी चोर आहे – उद्धव ठाकरे

*’‘चौकीदार चोर है’ अशी घोषणा देत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांच्या या घोषणेच्या सुरात सूर मिसळून उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरच्या मेळाव्यात ‘पहारेकरी चोर आहे’ अशा शब्दांत मोदी यांच्यावर निशाणा साधला. तसेच युती गेली खड्डय़ात असे वक्तव्यही केले होते.

शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी ठराव 

’‘एकला चलो रे’ या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वाभिमानी भूमिकेचे प्रतिनिधी सभा स्वागत करीत आहे. तसेच ही प्रतिनिधी सभा असा ठराव करीत आहे की, शिवसेना यापुढे स्वाभिमानानेच वाटचाल करील आणि २०१९च्या लोकसभा व विधानसभा निवडणुका या स्वबळावर लढून लोकसभेच्या २५ आणि विधानसभेच्या १५० जागांवर विजय प्राप्त करील व महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचे राज्य निर्माण करेल.

’हा ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला होता.

भाजपकडून सत्तेचा गैरवापर

’‘हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेने भाजपशी युती केली व २५ वर्षे टिकवली. युती टिकावी म्हणून शिवसेनेने अनेकदा संयम आणि त्यागाची भूमिका घेतली. पण गेल्या तीन वर्षांपासून शिवसेनेच्या खच्चीकरणाची संधी भाजप सोडत नाही आणि त्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे.

’शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील ठराव

शिवसेनेचे स्वबळाचे राज्य यावे

’शिवसेनेवर प्रखर हिंदुत्ववादी म्हणून घाला घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या साऱ्या नतद्रष्टांना कायमचे गाडण्याकरिता गवतास भाले फुटावेच लागतील आणि ते भाले हाती घेऊन शिवसेनेचे स्वबळाचे राज्य आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढावेच लागेल, असा ठराव प्रतिनिधी सभा करीत आहे.

’सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील ठराव.

राम मंदिराची तारीख जाहीर करा, अयोध्या २४ नोव्हेंबर २०१८

–  सरकारने राम मंदिर कधी बांधणार याची तारीख जाहीर करावे. चार वर्षे भाजपने राम मंदिर उभारणीकरिता पुढाकार घेतलेला नाही. आता तारीख सांगा, असे उद्धव  यांनी जाहीर केले होते.