मुंबईतील पोटनिवडणुकीत एकी; सेना नेत्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार शिवसेनेने केला असला तरी, मुंबई महानगरपालिकेच्या एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीकरिता शिवसेना आणि भाजप एकत्र आले आहेत. ही एकत्र येण्याची नांदी असल्याची चर्चा विधान भवन परिसरात सुरू झाली.

मुंबई महानगरपालिकेच्या प्रतीक्षानगर विभागातील प्रभाग क्र. १७३ मध्ये पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आहे. या प्रभागात भाजपने पाठिंबा द्यावा म्हणून शिवसेनेचे मंत्री व काही आमदारांनी विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर  उपस्थित होते. भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभागात गेल्या डिसेंबरमध्ये पोटनिवडणूक झाली असता शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. शिवसेना नगरसेवकाच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असल्याने या वेळी भाजपने पाठिंबा द्यावा, अशी शिवसेनेची भूमिका होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही भूमिका मान्य केली. या पोटनिवडणुकीत भाजप शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देईल, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी जाहीर केले.

भाजपचा पाठिंबा कशाला?

गेल्या जानेवारी महिन्यात शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला. तसा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनात मंजूर करण्यात आला होता. तरीही शिवसेनेचे मंत्री व आमदार पाठिंब्यासाठी भाजपकडे आल्याने भाजपच्या गोटातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी एकाच वेळी दुहेरी सामना करणे भाजपसाठी मोठे आव्हान असेल. यामुळेच शिवसेनेने बरोबर लढावे, असे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. अलीकडे भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या विरोधात कडक भूमिका किंवा शिवसेना नेत्यांना डिवचण्याची भाषणे करण्याचे टाळले आहे.

शिवसेना आमच्याबरोबर – मुख्यमंत्री

लोकसभेत तेलुगू देसमने सरकारच्या विरोधात मांडलेल्या अविश्वासाच्या ठरावाच्या वेळी शिवसेना आमच्याबरोबर असेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी शक्ती एकत्र आहेत, असे सांगत केंद्र व राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र असल्याची पुष्टी त्यांनी दिली.