अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भूमिका

युती ही दोन पक्षांच्या इच्छेने होत असते. शिवसेनेशी निवडणूकपूर्व युती व्हावी, ही भाजपची इच्छा आहे. पण शिवसेनेला युती करायची नसेल तर आमची हरकत नाही, असे नमूद करत भाजप निवडणुकांना ताकदीने सामोरे जाणार असून आगामी निवडणुकीतही भाजपचे एक पाऊल पुढेच पडेल, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी व्यक्त केला.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत चर्चा करण्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीची वेळ अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी मागितली आहे. उद्धव ठाकरे परदेशी गेल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात होणारी ही भेट बारगळली होती. सोमवारी मुनगंटीवार-ठाकरे भेट होणार असे वृत्त होते. मात्र ठाकरे यांच्या भेटीची वेळ मिळू न शकल्याने पुन्हा ही भेट बारगळली. शिवसेनेचा विरोध असतानाही केंद्रीय पातळीवर नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत करार झाला. त्याचबरोबर कडेगावमधील शिवसैनिकांच्या हत्येवरून उद्धव ठाकरे नाराज असून त्यामुळेच बैठकीची वेळ पुढे जात असल्याचे समजते. त्याचबरोबर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत युती होणार नाही, असे विधान केले.

या पाश्र्वभूमीवर मुनगंटीवार यांच्याकडे माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता आम्ही युती करणारे आहोत. युती तोडणारे आम्हाला व्हायचे नाही. त्याचबरोबर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने राज्यात अनेक प्रश्न निर्माण करून ठेवले. भाजप-शिवसेनेचे सरकार ते सोडवत आहे. लोकांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत युती तोडून पुन्हा लोकांच्या अपेक्षांचा भंग करण्यात अर्थ नाही. याच भावनेने युती करण्याचा भाजपचा विचार आहे. पण एकाच्या इच्छेने युती होत नसते. शिवसेनेची इच्छा नसेल तर हरकत नाही, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी रोजगाराबाबत राज्य सरकारवर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. राज ठाकरे यांची भाषणे आम्ही गांभीर्याने घेत नाही. १०० रिक्षा वाटून रोजगाराचा प्रश्न सोडवत असल्याचे त्यांना वाटत असेल तर त्यावर काहीच बोलता येणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.