मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीतील फटाक्याची पहिली माळ

मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये कुरघोडी सुरु झाली आहे. भाजपने आक्रमकपणे सेनेच्या कुरापती काढण्यास सुरुवात केल्याने सेनेच्या गोटातून प्रतिहल्ल्याची पूर्वतयारी सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने तर आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हाती फुलबाजे, लवंगी, आपटी बार आणि फटाक्यांच्या माळा सोपविल्या असून, शिवसेनेच्या नावाने जेथे जेथे जमेल तेथे तेथे फटाके वाजविण्याची तयारी ठेवा, असे गुप्त संदेशच कार्यकर्त्यांना धाडले आहेत. काल गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी पहिली फटाक्याची माळ वाजवून शिवसेनेला लक्ष्य केल्याने आता सेनेच्या तंबूतून कोणती आतषबाजी होते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा ढाण्या वाघ आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगत असत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही वेळोवेळी शिवसैनिकांना ढाण्या वाघ म्हणून संबोधतच त्यांचे रक्त सळसळत ठेवले. मात्र आता भाजप आक्रमक झाला आहे.

आगामी निवडणुकीत मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, महापौर भाजपचाच असला पाहिजे, यासाठी सर्व शक्तीनिशी वाघाचा मुकाबला करा, असा गुप्त संदेश भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत गेला आहे. काल  मुंबईत कर्नाक बंदर येथे ‘मेक इन इंडिया’चे बोधचिन्ह असलेल्या अनावरण करण्यात आले. त्या वेळी बोलताना प्रकाश मेहता यांनी सेनेच्या दिशेने टीकेचा पहिला ‘अग्निबाण’ सोडला. ‘मुंबईतील वाघ आता संपले, आता सिंहांचे राज्य सुरू झाले आहे,’ असा टोला खास गुजराती शैलीत मारत मेहता यांनी भाजपच्या आणि गुजरातच्या वर्चस्वाचे संकेतच देऊन टाकले. मुंबईतील मराठी मतदाराचे मतविभाजन करून सारी मराठी मते सेनेच्या पारडय़ात पडणार नाहीत यासाठी भाजपकडून अत्यंत गुप्तपणे नवी राजकीय गणिते व अनपेक्षित चाली खेळल्या जात असून गुजराती मतांचा गठ्ठादेखील आपल्याच झोळीत पडावा यासाठी नियोजनबद्ध आखणी सुरू झाली आहे.

शिवसेनेत अस्वस्थता

कर्नाक बंदर येथील कार्यक्रमात प्रकाश मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच सेनेला चिमटा काढला आहे. मुंबईतील वाघ केव्हाच संपले, आता गल्लीगल्लीत फक्त सिंह दिसतील, अशा सूचक शब्दांत मेहता यांनी सेनेच्या अस्तित्वालाच आव्हान दिल्याने शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. याआधी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनीही शिवसेनेच्या महापालिकेतील कारभारावर टीका करून संशयाचे वादळ माजविले होते. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या रणांगणावर सेना आणि भाजप हे सुरुवातीला तरी परस्परांचे प्रतिस्पर्धी म्हणूनच शड्डू ठोकून उभे राहतील, असे दिसत आहे.