‘आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या’ शेवाळे यांचे शेलार यांना आव्हान
नालेसफाईच्या कामावरून शिवसेना आणि भाजपमध्ये आता जुंपली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी ‘भाजप’च्या मुंबई शाखेचे अध्यक्ष व आमदार अ‍ॅड.आशीष शेलार यांना, ‘आरोप सिद्ध करा, अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्या,’ असे आव्हान दिले आहे. नालेसफाईचे काम चांगले झाले असल्याची शिफारसपत्रे ‘भाजप’ नगरसेवकांनी दिली असून आमदार पराग अळवणी यांनी त्यासाठी सत्कारही स्वीकारला होता, असे शेवाळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबईतील नालेसफाईच्या कामाबाबत प्रशासनाच्या चौकशी अहवालानंतर अ‍ॅड. शेलार यांनी पालिकेतील नालेसफाईच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या आरोपांचा समाचार घेताना शेवाळे म्हणाले, अ‍ॅड. शेलार हे महापालिकेची प्रतिमा मलिन करत आहेत. निलंबित करण्यात आलेल्या अभियंत्यांच्या कारवाईबाबत फेरविचार करण्याची मागणीही शेवाळे यांनी एका निवेदनाद्वारे केली.
बृहन्मुंबई महापालिका ही नगरविकास विभागाच्या आधिपत्याखाली येते. हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास असून महापालिकेत १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांच्या नेत्यांचे म्हणणे असेल तर चौकशी करावी. चौकशीत १०० कोटींचा भ्रष्टाचार झाला नसल्याचे आढळून आले तर शेलार यांचा आमदारकीचा राजीनामा मागून घ्यावा, असेही शेवाळे यांनी सांगितले.
नालेसफाईच्या कामाच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल पाटील समितीने दिला होता. त्यात सर्व कामाची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच कारवाई केली जावी, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे सर्व कंत्राटदारांची चौकशी पूर्ण होण्याआधी महापालिका आयुक्तांनी १४ अभियंत्यांवर कशाच्या आधारे निलंबनाची कारवाई केली, असा सवाल करून महापालिका आयुक्त ‘भाजप’च्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही शेवाळे यांनी केला.