News Flash

शिवसेना-भाजपमध्ये आता चित्रपटांवरून चढाओढ

‘उरी’ आणि ‘ठाकरे’चे तीन दिवसांचे खेळ कार्यकर्त्यांसाठी आरक्षित

शिवसेनेचे कार्यकर्ते ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीद्वारे सिनेमागृहात दाखल होत आहेत.

‘उरी’ आणि ‘ठाकरे’चे तीन दिवसांचे खेळ कार्यकर्त्यांसाठी आरक्षित

समीर कर्णुक, मुंबई

मेट्रोच्या कारशेडपासून लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक मुद्दय़ावर एकमेकांविरोधात उभे ठाकलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये आता चित्रपटांवरूनही अहमहमिका लागली आहे.

एकीकडे नुकताच प्रसिद्ध झालेला ‘ठाकरे’ हा चित्रपट आपल्या कार्यकर्त्यांना दाखवण्यासाठी  शिवसेनेचे नेते अवघे खेळ आरक्षित करत असताना भाजपने ‘उरी’ या चित्रपटाचे खेळ आरक्षित करून आपल्या कार्यकर्त्यांनाही खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. चेंबूरमध्ये शुक्रवार ते रविवार या तिन्ही दिवशी दोन्ही पक्षांनी या चित्रपटांचे अनेक खेळ कार्यकर्त्यांसाठी आरक्षित केले होते.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल’ हल्ल्यावर आधारित ‘उरी’ हा चित्रपट ११ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. त्यापाठोपाठ २५ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा चित्रपट झळकला. ‘उरी’ चित्रपटाला सुरुवातीपासूनच चांगले यश मिळत असताना हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत प्रदर्शित झालेला ‘ठाकरे’ चित्रपटही गर्दी खेचत आहे. त्यातही मुंबईसह राज्यभरात अनेक ठिकाणी शिवसेना आमदार, खासदार, नगरसेवक किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसाठी चित्रपटाचे अख्खे खेळ आरक्षित केल्याने तीन दिवसांतच या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट पाहायला जाणारे शिवसेनेचे कार्यकर्ते ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीद्वारे सिनेमागृहात दाखल होत आहेत. एकूणच यानिमित्ताने ‘ठाकरे’ चित्रपटाच्या माध्यमातून शिवसेनेने शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे.

शिवसेनेच्या या शक्तिप्रदर्शनाला आव्हान म्हणून आता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ‘उरी’ला बळ देण्यास सुरुवात केली आहे. चेंबूरमधील भाजपच्या एका नेत्याने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शनिवारी ‘उरी’चे काही खेळ आरक्षित केले होते. नेमके त्याच वेळी ‘ठाकरे’ चित्रपटासाठी शिवसेनेचे कार्यकर्तेही थाटामाटात सिनेमागृहाबाहेर जमले होते. त्यामुळे सिनेमागृहाबाहेर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची जुगलबंदी सर्वसामान्यांसाठी करमणुकीची ठरत होती. तर दोन्ही पक्षांच्या चढाओढीमुळे सिनेमागृहांना मात्र चांगली कमाई होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:49 am

Web Title: shiv sena bjp dispute over uri and thackeray movie
Next Stories
1 काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत मनसेला स्थान नाही!
2 पेंग्विन दर्शनाचा महापालिकेला लाभ
3 ‘लोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्री’ ही धूळफेक – मलिक
Just Now!
X