परस्परांविरोधात उभ्या केलेल्या उमेदवारांची माघार
मुंबई महापालिकेतील सत्तेत बिघाडी होऊ नये म्हणून शिवसेना-भाजपने हातमिळवणी करीत प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत परस्परांविरोधात उभ्या केलेल्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली. त्यामुळे सी आणि डी, पी-उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार विजयी झाले. तर आर-उत्तर आणि आर-मध्ये प्रभाग समितीच्या अध्यक्षदाची माळ शिवसेनेच्या उमेदवाराच्या गळ्यात पडली. अन्यथा या तिन्ही समित्यांवर युतीला पाणी सोडावे लागले असते.
पालिकेच्या ए, बी, ई, सी आणि डी, एफ-दक्षिण आणि एफ-उत्तर, जी दक्षिण, पी-दक्षिण, पी-उत्तर, आर-दक्षिण, आर-उत्तर व आर-मध्य या आठ प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला विश्वासात न घेतल्याने भाजपने शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली होती. भाजपला शह देण्यासाठी शिवसेनेकडूनही तीच खेळी खेळण्यात आली. मात्र पुढील वर्षी पालिका निवडणूक होऊ घातली असून परस्परांना शह देण्यात आपलेच नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेना आणि भाजपने एक पाऊल मागे घेत हातमिळवणी केली.
पी-उत्तर प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुनील गुजर यांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे उमेदवार ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. ११ मते मिळालेल्या ज्ञानमूर्ती शर्मा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार परमिंदर रतनसिंग भामरा यांचा पराभव केला. सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी शिवसेनेने नगरसेवक अनिल सिंह यांना रिंगणात उतरविले. दिलजमाई होताच अनिल सिंह यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपच्या सरिता पाटील या बिनविरोध निवडून आल्या.