मुंबई : बुधवारपासून मुंबई महापालिकांच्या प्रभाग समिती निवडणुका सुरू होणार असून या वेळी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे नगरसेवक तटस्थ राहणार की शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

वैधानिक आणि विशेष समित्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर बुधवार, १४ ऑक्टोबरपासून १७ प्रभाग समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत. सोमवारी या निवडणुकांसाठी नामांकन भरण्यासाठी शेवटची तारीख होती. त्यात केवळ भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. आपले संख्याबळ ओळखून १७ पैकी १५ समित्यांसाठी भाजपने अर्ज भरले आहेत, तर शिवसेनेने १४ समित्यांसाठी अर्ज भरले आहेत.

पालिकेत शिवसेनेची सत्ता असली तरी प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व आहे. १७ पैकी नऊ समित्यांवर भाजपचे नगरसेवक अध्यक्ष होते, तर  शिवसेनेकडे आठ समित्या होत्या. ज्या ठिकाणी भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी शिवसेनेने आपले अर्ज दाखल केलेले नाहीत.

दरम्यान, वैधानिक व विशेष समित्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने आयत्या वेळी माघार घेतली, तर राष्ट्रवादी आणि सपा यांनी सेनेला मतदान केले. शिवसेनेला अप्रत्यक्ष मदत केल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाला काही प्रभाग समित्या शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र काँग्रेसने एकही अर्ज भरलेला नाही. तसेच सर्व ठिकाणी शिवसेनेने आपलेच उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आता ही लढत सेना आणि भाजपमध्येच होणार असल्याचे स्पष्ट आहे.

दरम्यान, प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी काँग्रेसचे नगरसेवक अनुपस्थित राहणार की सेनेला मतदान करणार याबाबत भूमिका आम्ही ठरवू, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिली. मात्र प्रभाग समित्यांमध्ये स्थानिक पातळीवरील विचार करून मतदान करण्याचे अधिकार नगरसेवकांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपला लांब ठेवणार

काँग्रेसचे संख्याबळ कमी आहे म्हणून आम्ही कुठेही आमचा उमेदवार दिलेला नाही. अर्ज भरून कोणाकडे मते मागण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही अर्ज भरले नाहीत. आम्ही विरोधी पक्षात आहोत. पण कुठल्याही परिस्थिती भाजपला जागा मिळू नये ही आमची भूमिका आहे, असेही रवी राजा यांनी स्पष्ट केले.