News Flash

अभाविप, युवासेनेला ‘अच्छे दिन’

विद्यार्थी संघटनांच्या जोरावर सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने आता आपल्या कार्यकर्त्यांचेही भले करण्याच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.

| January 13, 2015 03:16 am

विद्यार्थी संघटनांच्या जोरावर सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेना सरकारने आता आपल्या कार्यकर्त्यांचेही भले करण्याच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी स्वामी विवेकानंद युवामित्र योजना सुरू करण्यात आली असून त्यावर या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यकर्त्यांना तीन आणि पाच हजार रूपये असे मानधनही मिळणार आहे. त्यामुळे  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तसेच युवासेनेच्या कार्यकर्त्यांसाठी खऱ्या अर्थाने आता ‘अच्छे दिन’ येण्याची लक्षणे दिसू लागली आहेत.
आघाडी सरकारच्या काळात तयार झालेल्या युवा धोरणातील महत्वाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून युवकांसाठी युवामित्र योजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती क्रिडा आणि युवककल्याणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. युवामित्र म्हणून त्या भागातील सामाजिक कार्य करणाऱ्या युवकांच्या नियुक्त्या करण्यात येणार असून सामाजिक, राजकीय संघटनांमधील चांगल्या तरूणांना त्यासाठी संधी देण्यात येणार असल्याने ही योजना स्वपक्षीय कार्यकर्त्यांसाठी त्यातही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांंसाठी असल्याचे बोलले जात आहे. महाविद्यालय, विद्यापीठामध्ये निवडणुका घेण्याबाबत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात सर्व विद्यार्थी संघटनांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या असून त्यांची मते जाणून घेणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवडणुकांबाबत विद्यापीठ कायद्यात बदल करण्याचा विचार केला जाईल असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

अशी असेल योजना..
या योजने अंतर्गत राज्यातील ३५८ तालुके आणि मुंबईतील २४ विभागात तसेच प्रत्येक जिल्हयात एका युवामित्राची नियुक्ती केली जाणार आहे. तालुका स्तरावरील युवामित्राला महिना तीन हजार तर जिल्हा स्तरावरील युवामित्राला पाच हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या धर्तीवरच ही योजना असेल. युवामित्रांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, शासनाच्या विविध योजनांबद्दल तरूणांना मार्गदर्शन अशी कामे केली जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 3:16 am

Web Title: shiv sena bjp government start beneficial scheme to their workers
Next Stories
1 नंदुरबार येथील सहाजणांकडून कर्ज घेतले
2 चार महिन्यांत एसी लोकल
3 मनसेच्या इंजिनाचे तीन डबे भाजपच्या रुळावर
Just Now!
X