काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या विरोधातील मतांमध्ये फूट पडू नये, यासाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय समाज पक्ष आणि इतर काही लहान-मोठय़ा पक्षांना बरोबर घेऊन महायुतीचा विस्तार करण्याचे भाजप-शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. अर्थात त्यात जागावाटपात महायुतीची खरी कसोटी लागणार आहे.
राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधील विधानसभा  निवडणुकांचे निकाल काँग्रेसच्या विरोधात गेल्यानंतर महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना-रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनाही महाराष्ट्रात राजकीय बदलाची आशा वाटू लागली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधातील लहान पक्षांना सोबत घेण्याचा विचार सुरू असून त्यादृष्टीने काही पक्षांशी बोलणीही सुरू असल्याचे सांगण्यात येते.
मागील लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभव करून राजू शेट्टी यांनी सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता. गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने करून त्यांनी आपल्या पक्षाचा पाया विस्तारला आहे. शेट्टी यांचे राजकारण पहिल्यापासूनच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात राहिले आहे. त्यामुळे महायुतीत त्यांना आणण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. शेट्टी यांच्या पक्षाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील मिळून साधारणत: ८-१० मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे.
महादेव जानकर हे पुरोगामी चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला आहे. मागील निवडणुकीत त्यांनी माढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात एक लाखाच्या आसपास मते मिळविली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातील जानकर यांचा मतदार आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांना महायुतीत घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. जानकर यांनीही महायुतीसोबत जाण्याची तयारी दर्शविली आहे.