News Flash

निवडणुकीच्या इशाऱ्यानंतर शिवसेना नरमली?

दोन ज्येष्ठ भाजप मंत्री ‘मातोश्री’ वर जाणार

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

दोन ज्येष्ठ भाजप मंत्री ‘मातोश्री’ वर जाणार

शिवसेनेकडून विरोधी पक्षाप्रमाणे वारंवार त्रास दिला जात असल्याने भाजपकडून मध्यावधी निवडणुकीचा इशारा देण्यात आल्यावर शिवसेनेतून नरमाईचा सूर दिसू लागला आहे. शिवसेनेचे वर्तन सुधारले नाही तर निवडणुका किंवा अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल, असा इशारा देण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे भाजपचे दोन ज्येष्ठ मंत्री दोन-तीन दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सत्तेत असूनही शिवसेनेने कर्जमाफी व अन्य मुद्दय़ांवरुन भाजपला गेल्या काही दिवसांपासून हैराण केले आहे. विरोधकांशी हातमिळवणी करुन विधिमंडळात भाजपची पंचाईत केली. त्यामुळे भाजप नेत्यांमध्ये शिवसेनेविरोधात तीव्र संताप असून सुकाणू समितीच्या बैठकीत त्याबाबत गुरुवारी सविस्तर चर्चा झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे २९ सदस्य भाजपमध्ये येण्यासाठी तयार असून राजीनामे घेऊन त्यांना पुन्हा निवडून आणायचे किंवा मध्यावधी निवडणुका घ्यायच्या, या दोन पर्यायांवर बैठकीत चर्चा झाली.

शिवसेनेने आपली भूमिका बदलून वर्तन सुधारावे, अन्यथा भाजपला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील हे ठाकरे याची  दोन-तीन दिवसांत, बहुधा २९ मार्च रोजी भेट घेऊन चर्चा करणार आहेत, असे समजते. मात्र, उद्धव ठाकरे स्वत या मंत्र्यांशी चर्चा करतात किंवा अन्य नेत्याना चर्चा करण्यास सांगतात, याविषयीचा अंदाज वर्तविण्यास या सूत्रांनी असमर्थता व्यक्त केली. तथापि, या वादामुळे शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा खणाखणी सुरु होण्याचेच संकेत असून शिवसेनाही आक्रमक भूमिका सोडणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेची भलामण; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी योजना तयार करणार

मुंबई : शिवसेनेमुळे संत्रस्त झालेल्या भाजपने मध्यावधी निवडणुकीचा इशारा गुरुवारी दिल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्दय़ावर निवेदन करताना शिवसेनेची मागणी व हेतू चांगला असल्याची भलामण केली. विरोधकांनी शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवली, तरी त्याचा उपयोग होणार नाही, असे स्पष्ट करीत फडणवीस यांनी कर्जमाफीची योजना तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र कर्जमाफी होईल, यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज थकवू नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

शिवसेनेच्या आमदारांनी माहितीच्या मुद्दय़ावर कर्जमाफीची मागणी केल्यावर त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केले. शिवसेनेची कर्जमाफीची मागणी रास्तच असून राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध असल्याचे मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही सांगितले आहे. त्यामुळे विरोधकांनी शिवसेनेचा वापर करून वार करू नये, ते उघडे पडले आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार कर्जमाफीसाठी योजना करीत असून कर्ज माफ होईल, म्हणून ते भरण्याचे शेतकऱ्यांनी थांबवू नये. नाही तर बँकांची अडचण होईल. आपण कर्ज थकविले असते, तर बरे झाले असते, असला विचार शेतकऱ्यांनी करू नये, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

केंद्र सरकारची मदत मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पण ती मिळाली नाही, तरी राज्य सरकार त्याबाबत निर्णय घेईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. थकीत कर्जच माफ करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले असून प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही काही लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 2:05 am

Web Title: shiv sena bjp sudhir mungantiwar chandrakant patil
Next Stories
1 Tukaram Mundhe : लोकसत्ता आमची भूमिका : मुंढे यांची तडकाफडकी बदली
2 बेकायदा बांधकामांना वाचविणारे धोरण रद्द
3 राजकारणात हुशार, मात्र राज्यकर्ते म्हणून कमकुवत!
Just Now!
X